‘स्मार्ट वॉच’ तहकूब नको, रद्दच करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 03:00 IST2018-12-18T03:00:23+5:302018-12-18T03:00:36+5:30
थेटपणे काम करणे येणार अंगलट : महापालिकेतील विरोधी पक्षाचे गटनेते, सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

‘स्मार्ट वॉच’ तहकूब नको, रद्दच करा!
पिंपरी : स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली महापालिकेच्या वतीने स्मार्ट वॉच माथी मारण्याचे काम सुरू आहे. अनेक महापालिकांमध्ये अपयशी ठरलेली योजना माथी मारण्याचा घाट कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत असून, स्मार्ट वॉचमधून होणारी जनतेच्या पैशांची लूट थांबवावी, अशी मागणी सर्वपक्षीय गटनेत्यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. पारदर्शक कारभाराच्या नावाखाली थेट पद्धतीने काम देण्याचा पायंडा पाडला जात आहे. त्यास सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. महापालिका आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही खरेदी होणार आहे. नागपूरमध्ये बंद पडलेला पॅटर्न पिंपरीत राबविण्याचा घाट आहे. दरांमध्ये तफावत असण्याबरोबरच प्रत्यक्ष कामाचे आॅडिट त्यातून होणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे. निविदाप्रकियेला फाटा देण्याचे गौडबंगाल काय, असे प्रश्न उपस्थित होतात. थेट पद्धतीने वॉच खरेदी करण्यातून कोट्यवधींचा गैरव्यवहार करण्याचे प्रशासनाचे धोरण आहे. असे असताना महापालिकेतील विरोधी पक्ष केवळ पत्रक काढण्यापलीकडे काहीही करीत नसल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट वॉचच्या नावाखाली लूट सुरू आहे, असे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी त्यास विरोध दर्शविला आहे.
साने म्हणाले, ‘‘स्वच्छता ठेकेदारांना मनपाने ठेका दिलेला आहे. त्यासाठी लाखो रुपये मोजत आहे. या खासगी स्वच्छता कामगारांना स्मार्ट घड्याळे कशासाठी पुरविण्यात येत आहेत? ही जबाबदारी ठेकेदारांची आहे, निविदा रद्द करावी.’’
अॅड. सागर चरण म्हणाले, ‘‘सफाई कामगारांना योग्य साधने उपलब्ध नसतानाच महापालिका कर्मचाºयांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून ‘स्मार्ट वॉच’ घेण्याचा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला आहे. तो कायमचा रद्द करण्यात यावा, महापालिका कर्मचाºयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्तांनी स्थायी समितीसमोर ‘स्मार्ट वॉच’चा प्रस्ताव ठेवला होता. वॉचवर कोट्यवधींचा खर्च होत आहे. मात्र, दुसºया बाजूला सफाई कामगारांना बूट, हातमोजे दिले गेले नाहीत. त्यांना मूलभूत सुविधा नसताना महापालिका प्रशासन अशा स्मार्ट वॉचवर कोट्यवधी रुपये उधळत आहे. त्यातही अशा थेट पद्धतीने हे साहित्य खरेदीला विरोध आहे.’’
तक्रारी बेसुमार : थेटपणे काम कशासाठी?
सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले, ‘‘शहराची वाढती
लोकसंख्या आणि वाढत्या विस्तारामुळे महापालिकेने साफसफाईकामी बाह्यस्रोतांचा (आउटर्सोसिंग) अवलंब सुरु केला आहे. आरोग्य
कामकाजावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही तक्रारींची
संख्या मात्र बेसुमार आहे. काही सफाई कामगारांच्या कामचुकारपणामुळे सर्वच कामगारांवर ताशेरे ओढले जातात. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत
या स्मार्ट वॉचची खरेदी केली जाणार आहे. काही कामचुकार
कर्मचाºयांमुळे ही खरेदी होत आहे. मात्र एक-दोन टक्के
कर्मचाºयांमुळे सर्वच कर्मचाºयांवर अविश्वास दाखवणे योग्य
नाही. चढ्या दराने खरेदी होऊन महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान
होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाºयांना मूलभूत सुविधा व अत्यानुधिक उपकरणे पुरवावीत.’’
आरोग्य विभागासाठी स्मार्ट वॉच थेट पद्धतीने खरेदीचा प्रयत्न आहे. कोणाला तरी डोळ्यांसमोर ठेवून ही निविदा काढली आहे. घड्याळे थेट पद्धतीने उपलब्ध करून घेण्यासाठी घाई कशासाठी? निविदा मागविणे अपेक्षीत होते.
-दत्ता साने, विरोधी पक्षनेता
महापालिकेत स्मार्ट वॉचचा नागपूर पॅटर्न राबविण्याचे धोरण आहे. तातडीची बाब म्हणून ‘स्मार्ट वॉच’ थेट पद्धतीने खरेदी करण्याचे नियोजन आहे. थेट पद्धतीने खरेदीचा घाट कशासाठी घातला जातोय.
-सचिन चिखले, मनसे गटनेता
महापालिकेतील आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत. सत्ताधाºयांमधील गोंधळामुळे निविदाप्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे घरोघरचा कचरा उचलण्याचे काम सक्षमतेने होत नाही. कंपनी, ठेकेदार पोसण्याचे धोरण आहे.
- राहुल कलाटे, शिवसेना गटनेता