‘एमआयएम’ची भीती दाखवून सनातनला वाचवू नका

By Admin | Updated: September 30, 2015 02:43 IST2015-09-30T00:59:21+5:302015-09-30T02:43:10+5:30

‘एमआयएम’ जर अतिरेकी कारवाया करत असेल तर जरूर या संघटनेवरही बंदी आणावी; परंतु एमआयएमविरोधात तसे गुन्हे दाखल नाहीत.

Do not save Sanatan by showing fear of 'MIM' | ‘एमआयएम’ची भीती दाखवून सनातनला वाचवू नका

‘एमआयएम’ची भीती दाखवून सनातनला वाचवू नका

पुणे : ‘एमआयएम’ जर अतिरेकी कारवाया करत असेल तर जरूर या संघटनेवरही बंदी आणावी; परंतु एमआयएमविरोधात तसे गुन्हे दाखल नाहीत. त्याउलट सनातनच्या कार्यकर्त्यांवर अतिरेकी कारवायांचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मंत्री एकनाथ खडसेंनी ‘एमआयएम’चे नाव घेऊन सनातनला वाचवू नये, अशी टीका माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. सनातनी प्रवृत्तींविरोधात देश बचाव आघाडी रविवारी पुण्यात सभा घेत आहे.
सनातनवर बंदी आणणे अशक्य आहे. जर या संघटनेवर बंदी आणायची असेल, तर अससुद्दीन ओवेसी आणि त्यांच्या एमआयएम पक्षावरही बंदी आणावी लागेल, असे विधान खडसे यांनी केले आहे. त्यासंदर्भात कोळसे बोलत होते. ते म्हणाले, ‘खडसे दिशाभूल करत आहेत. सनातनच्या काही कार्यकर्त्यांचा बॉम्ब तयार करत असताना मृत्यू झाला आहे. काही हिंसक घटनांप्रकरणी कार्यकर्त्यांना शिक्षा झालेली आहे. ही संघटना उघड उन्मादाची भाषा करत आहे. पोलिसांना धमक्या देत आहे. सनातनला सध्याचे राष्ट्रच मान्य नाही. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर या संघटनेने एक प्रकारचा आनंद व्यक्त केला आहे. या संघटनेवर बंदी आणण्यास हे सर्व पुरावे पुरेसे आहेत. मात्र, अशा सनातनी प्रवृत्ती या सरकारलाच हव्या आहेत.’
देशातील सर्व संस्थांचे संघीकरण झाले असून, सनातनी प्रवृत्ती वाढत आहेत. अगदी पोलीस व गुप्तचर यंत्रणांतही संघीय प्रवृत्ती आहेत. त्यामुळे याविरोधात देश बचाव आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीच्या वतीने रविवारी (दि. ४) दुपारी ३ वाजता पुण्यात शनिवारवाड्यावर जाहीर सभा घेतली जाणार आहे. या सभेत माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, आमदार जितेंद्र आव्हाड, भाई वैद्य, एस. एम. मुश्रीफ, बिशप कांबळे, श्रीमंत कोकाटे, आनंद आंबेडकर, सुभाष वारे, प्रतिमा परदेशी, राहुल पोकळे आदी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Do not save Sanatan by showing fear of 'MIM'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.