शहरात दिवाळी कोट्यवधींची

By Admin | Updated: November 14, 2015 03:05 IST2015-11-14T03:05:48+5:302015-11-14T03:05:48+5:30

वर्षातील सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळीला नवीन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाते. यामुळेच विविध वस्तूंच्या खरेदीतून गेल्या पाच दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरात कोट्यवधींची उलाढाल झाली

Diwali billions of people in the city | शहरात दिवाळी कोट्यवधींची

शहरात दिवाळी कोट्यवधींची

पिंपरी : वर्षातील सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळीला नवीन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाते. यामुळेच विविध वस्तूंच्या खरेदीतून गेल्या पाच दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरात कोट्यवधींची उलाढाल झाली. सोन्याचे भाव घसरल्याने सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.
पिंपरीसह शहरातील विविध दुकानांमध्ये वाहन, कपडे, इलेक्ट्रिकल वस्तू, सोने आदींची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पिंपरी कॅम्प येथे विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध असतात. त्यामुळे शहरासह शहरालगतच्या देहूरोड, देहू, तळेगाव, वडगाव, हिंजवडी, मारुंजी, जांबे, किवळे, मोशी या परिसरातील नागरिकही येथे खरेदीला येतात.
दसऱ्यानंतर सोन्याचे भाव उतरल्याने सोने खरेदीसाठी खऱ्या अर्थाने दसऱ्यानंतरच गर्दी वाढू लागली. दिवाळीपूर्वी २७ हजार रुपये प्रति तोळा असलेले सोने ऐन दिवाळीत २५ हजारांवर आले. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी झाली. लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला सोने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने खरेदी करण्यात आली.
कपडे खरेदीसाठी अनेकांकडून पिंपरीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे दिवाळी सुरू होण्याअगोदरच गेल्या आठ दिवसांपासून खरेदीसाठी पिंपरी कॅम्पात गर्दी होती. कॅम्पात सुमारे दोनशे कपड्यांची दुकाने आहेत, तर शहरात दोन हजारांच्या वर दुकानांची संख्या आहे. कपडे खरेदीत कोट्यवधींची उलाढाल झाली. आॅनलाइन शॉपिंग आणि मॉलमुळे दुकानांमधील खरेदीवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून आले.
पिंपरी कॅम्पात वाहने उभी करण्यासाठी व्यवस्था नसल्याने वाहन घेऊन येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होत होती. त्यामुळे अशा ग्राहकांनी कॅम्पातील दुकानांमधून खरेदी करण्याऐवजी शहरांतील मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या मॉलमधून खरेदी करण्यास पसंती दिली, तर आयटीतील तरुण-तरुणींनी आॅनलाइन शॉपिंग करण्यास पसंती दिली. दुचाकी, चारचाकी वाहने खरेदी करण्यासाठी शोरूममध्ये गर्दी होती. अनेकांनी लक्ष्मीपूजन, पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन घरी आणण्यास प्राधान्य दिले.
यासाठी महिना, दोन महिन्यांपूर्वीच वाहनांची ‘बुकिंग’ करून ठेवली
होती. वाहन खरेदीत मोठी
उलाढाल झाली.(प्रतिनिधी)

Web Title: Diwali billions of people in the city