सुट्या पैशाअभावी पर्यटकांची गैरसोय
By Admin | Updated: November 10, 2016 01:24 IST2016-11-10T01:24:30+5:302016-11-10T01:24:30+5:30
केरळ, कन्याकुमारी, राजस्थान, हैदराबाद या ठिकाणी, तसेच बॅँकॉक, सिंगापूर या ठिकाणी परदेश दौऱ्यावर गेलेल्या पर्यटकांना पावलोपावली सुटे पैसे उपलब्ध होण्यास

सुट्या पैशाअभावी पर्यटकांची गैरसोय
पिंपरी : केरळ, कन्याकुमारी, राजस्थान, हैदराबाद या ठिकाणी, तसेच बॅँकॉक, सिंगापूर या ठिकाणी परदेश दौऱ्यावर गेलेल्या पर्यटकांना पावलोपावली सुटे पैसे उपलब्ध होण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यांच्याकडे असलेल्या हजार, पाचशेच्या नोटा चलनात येत नसल्याने गैरसोयींशी सामना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. परदेशात गेलेल्या पर्यटकांना तरी त्या देशाचे चलन उपलब्ध होत असल्याने, तसेच डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर करता येत असल्याने अडचणी कमी आहेत. मात्र, देशांतर्गत प्रवास करणाऱ्या पर्यटकांना अडचणींना तोंड द्यावे लागते आहे.
दिवाळीची सुटी संपून शाळा सुरू होण्यास आणखी एक आठवड्याचा कालावधी उरला आहे. त्यामुळे काहींनी या आठवड्यात राज्यातील पर्यटन स्थळांना, तसेच बाहेरच्या राज्यात पर्यटनास जाण्यास प्राधान्य दिले आहे. पर्यटनास निघून गेल्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार, पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्याचा निर्णय घेतला. एटीएमचे व्यवहार ठप्प झाले. नव्या नोटा चलनात येण्यास काही दिवसांचा अवधी असल्याने बँका बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे शंभराच्या नोटा उपलब्ध होईनात, हजार-पाचशेच्या नोटा स्वीकारण्यास दुकानदार, पेट्रोलपंप चालकांनी नकार दिला.
दूरच्या प्रवासाला गेलेल्यांना हजार, पाचशेच्या नोटा घेऊन गेलेल्यांना पदोपदी अडचणी जाणवू लागल्या आहेत. रेल्वेगाडीचे आरक्षण करून कोणी आठ दिवसांच्या, तर कोणी १५ दिवसांच्या दौऱ्यावर गेलेल्यांची पंचाईत झाली. (प्रतिनिधी)