महापालिका शाळांमध्ये लवकरच डिजिटल लायब्ररी
By Admin | Updated: June 15, 2016 05:05 IST2016-06-15T05:05:44+5:302016-06-15T05:05:44+5:30
शाळा सुरू होताच शालेय साहित्य मिळत नसल्याची ओरड होते. यासह महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गळती, गुणवत्ता वाढीचे प्रयत्न, शालाबाह्य मुलांसाठी शिक्षण मंडळाचे उपक्रम

महापालिका शाळांमध्ये लवकरच डिजिटल लायब्ररी
शाळा सुरू होताच शालेय साहित्य मिळत नसल्याची ओरड होते. यासह महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गळती, गुणवत्ता वाढीचे प्रयत्न, शालाबाह्य मुलांसाठी शिक्षण मंडळाचे उपक्रम, शिक्षक व मुख्याध्यापकांची रखडलेली पदोन्नती व शिक्षकांच्या बदल्यांमध्ये येणाऱ्या अडचणीचा प्रशासनाला कशा प्रकारे सामना करावा लागतो. या अनुषंगाने शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी बी. सी. कारेकर यांची घेतलेली मुलाखत.
यंदा १५ जूनला पहिल्याच दिवशी मुलांना वेळेत शालेय साहित्य मिळविण्यासाठी काय प्रयत्न केले गेले.
यंदा मुलांना सर्व शालेय वस्तू पहिल्याच दिवशी मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. सर्व साहित्याचे एका शाळेतून इतर शाळांमध्ये प्राथमिक स्वरूपात वाटप होणार आहे. त्या दृष्टीने पिंपळे गुरव महापालिका शाळेत शालेय साहित्य वाटपाचे नियोजन केले आहे.
शालाबाह्य मुले समाविष्ट करण्यासाठी शाळा पातळीवर काय प्रयत्न केले गेले आहेत?
शाळा पातळीवर शाळाबाह्य मुलांसाठी एप्रिल महिन्यातच सर्वेक्षण झाले. त्यासाठी समिती नेमण्यात आली होती. सुट्टीच्या कालावधीतही हे काम सुरू असल्यामुळे या वर्षी शालाबाह्य मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे.
पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष कोणते प्रयत्न करण्यात आले?
शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी ७ मेपूर्वीच प्रवेश सुरू केले होते. त्यामुळे शाळा प्रवेश ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार आहेत. नक्कीच यंदा पटसंख्येत वाढ होईल. तसेच शाळास्तरावर विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा ओढा निर्माण होईल.
यंदाच्या वर्षी नवनवीन कोणत्या संकल्पना हाती घेतल्या आहेत?
महापालिकेच्या ५० शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी सुरू केली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी एक संस्था विनामोबदला सहकार्य करीत आहे. त्याचप्रकारे स्वतंत्र बालवाडी अभ्यासक्रम तयार केला आहे. प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षकांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा भरविल्या आहेत. रोटरी क्लबमार्फत विद्यार्थ्यांना सायबर क्राईमचे प्रशिक्षण देण्यासाठी शाळा स्तरांवर सीडीचे वाटप ३० जूनपर्यंत केले जाणार आहे. त्याचप्रकारे ज्या शाळांचे शिक्षक बारावी सायन्स झाले आहेत, त्या शाळांमध्ये पहिलीपासूनच सेमी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. पूर्वी फक्त ठरावीक शाळांमध्ये सेमी वर्ग होते.
गुणवत्ता वाढीसाठी विशेष कोणते उपक्रम राबविले जाणार आहेत.
गुणवत्तावाढीसाठी हस्ताक्षरलेखन उपक्रम सुरू च आहे. त्याचप्रकारे विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्याचप्रकारे मुलांच्या बुद्धिमत्तावाढीसाठी इंग्रजी विषयावर भर दिला जाणार आहे. पाढे पाठांतराचा उपक्रमही सुरू आहे. ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांना या वर्षापासून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.