स्वाईन फ्लू लसीबाबत मधुमेही व रक्तदाबाच्या रुग्णांत उदासीनता
By Admin | Updated: January 22, 2016 01:52 IST2016-01-22T01:52:15+5:302016-01-22T01:52:15+5:30
राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेतर्फे मधुमेही रुग्ण व रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी मोफत स्वाईन फ्लू लसीकरणाची सुविधा १ डिसेंबरपासून चालू करण्यात आली होती

स्वाईन फ्लू लसीबाबत मधुमेही व रक्तदाबाच्या रुग्णांत उदासीनता
पुणे : राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेतर्फे मधुमेही रुग्ण व रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी मोफत स्वाईन फ्लू लसीकरणाची सुविधा १ डिसेंबरपासून चालू करण्यात आली होती. मात्र त्याला अजिबात प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाकडून आलेल्या स्वाईन फ्लूच्या लसी पडून असल्याचे चित्र आहे.
मधुमेह व उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना स्वाईन फ्लू होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांनी जास्त काळजी घेणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर हा मोफत लसीकरणाचा उपक्रम चालू असून, याला प्रतिसाद नसल्याचे दिसते. डिसेंबरपासून राबविण्यात आलेल्या या मोहिमेचा फायदा केवळ १० रुग्णांनी घेतला असून, यामध्ये ६ उच्च रक्तदाबाचे, १ मधुमेहाचा तर ३ जण दोन्ही आजाराचे रुग्ण आहेत. जानेवारीच्या २१ तारखेपर्यंत तर कोणीही लसीकरणाचा फायदा घेतला नाही. साधारणत: जून-जुलै आणि फेब्रुवारी-मार्च यादरम्यान असणारे तापमान स्वाईन फ्लूच्या एच१एन१ या विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे या दरम्यान स्वाईन फ्लूच्या रुग्णांत वाढ होण्याची शक्यता असते. मधुमेही, रक्तदाब व गर्भवती महिला या आजाराच्या शिकार बनण्याची शक्यता जास्त असल्याने त्यांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मात्र, यात आरोग्याच्या प्रश्नांबाबत जागृती नाही की महापालिकेकडून या योजना योग्य पद्धतीने पोहोचत नाहीत, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र ही उदासीनता आरोग्यावर बेतू शकते, त्यामुळे रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लसीकरण अधिकारी डॉ. कल्पना बळवंत यांनी केले आहे.
या लसीमुळे मधुमेह किंवा रक्तदाब झालेल्या रुग्णाची प्रतिकारशक्ती ८ महिने ते १ वर्षापर्यंत टिकू शकते. परंतु लसीकरणानंतर साधारणत: ४ आठवड्यांनी ही प्रतिकारशक्ती तयार होते. ही लस महापालिकेच्या ६ दवाखान्यांमध्ये तसेच ससून जनरल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या काळात मधुमेही व रक्तदाबाच्या रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पालिकेकडून करण्यात येत आहे.