वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी
By Admin | Updated: March 1, 2017 17:18 IST2017-03-01T17:18:22+5:302017-03-01T17:18:22+5:30
दिवसेंदिवस विस्तारत चाललेल्या चाकण शहरातील सेवांतर्गत रस्ते म्हणजे 'असून अडचण, अन् नसून खोळंबा' अशी अवस्था असल्याने शहरात वाढत्या बकालपणामुळे

वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी
ऑनलाइन लोकमत
चाकण, दि. 01 - दिवसेंदिवस विस्तारत चाललेल्या चाकण शहरातील सेवांतर्गत रस्ते म्हणजे 'असून अडचण, अन् नसून खोळंबा' अशी अवस्था असल्याने शहरात वाढत्या बकालपणामुळे चाकणकर अक्षरश: रडकुंडीला आले आहेत. वाहनचालक व अवैध प्रवासी वाहतूक करणारे सहा आसनी रिक्षावाले अक्षरश: महामार्गावर बेशिस्तपणे वाहने लावल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
चाकण शहरात प्रवेश करायचा म्हटले तर सर्व प्रथम दुर्गंधीशी सामना करावा लागतो. पुण्याहून येताना मुटकेवाडी ते माणिक चौक दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा पथारीवाल्यांच्या कृपाशीर्वादाने घाणीचे साम्राज्य पसरल्याने दुर्गंधी सुटली आहे. तळेगाव चौकातून भुयारी मार्गाकडे जाताना सेवांतर्गत रस्ते असून नसल्यासारखेच आहेत. याठिकाणी अवैध वाहतूक करणारे रिक्षा चालक, जीपवाले पुणे नासिक महामार्गावर कशाही पद्धतीने वाहने लावतात व गाड्यांमध्ये कोंबून प्रवासी भरतात. त्यामुळे वहातुकीला अडथळा तर होतोच पण महामार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघातही होतात. तसेच उड्डाणपुलाखाली व महामार्गावरच काही वाहनचालक आपली वाहने पार्किंग करून गेल्याने वाहतूक कोंडी होते.
तळेगाव चौक व आंबेठाण चौकातही सेवांतर्गत रस्त्यावर सहा आसनी रिक्षा उभ्या राहिल्याने शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन तरुणींना मनस्ताप सहन करावा लागतो. अशा पद्धतीने सेवांतर्गत रस्त्यावर वहाने लावून शहराचा बकाल पणा वाढवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी चाकणकर नागरिकांकडून होत आहे.