विचित्र अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
By Admin | Updated: November 10, 2015 01:46 IST2015-11-10T01:46:23+5:302015-11-10T01:46:23+5:30
येथील मुकाई चौक ते आदर्शनगर रस्त्यावर माळवाले वस्तीजवळ दोन दुचाकींची जोरदार धडक झाल्यांनतर अंगावरून पीएमपी बसचे चाक जाऊन एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला

विचित्र अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
किवळे : येथील मुकाई चौक ते आदर्शनगर रस्त्यावर माळवाले वस्तीजवळ दोन दुचाकींची जोरदार धडक झाल्यांनतर अंगावरून पीएमपी बसचे चाक जाऊन एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. एक तरुण जखमी असून, त्याच्यावर देहूरोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसचालक धनंजय खरात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने बसच्या काचा फोडून बसचे नुकसान केले आहे.
प्रमोद विश्वनाथ केंगार (वय ४२, रा. बापदेवनगर, किवळे) असे अपघातात मरण पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून, हरी चौधरी (वय २२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास निगडी ते आदर्शनगर मार्गावरील पीएमपी बस (एमएच १४ सीडब्लू १८४७) किवळेतील मुकाई चौकाकडून आदर्शनगरला जात असताना माळवाले वस्तीजवळ समोरून येणारी एक दुचाकी व बसला ओव्हरटेक करून जाणारी दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. त्या वेळी दुचाकीस्वार केंगार यांच्या अंगावरून बसचे चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला असून, हरी चौधरी हा जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरूआहेत. बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)