दिवसाआड पाणी कपात लांबणीवर
By Admin | Updated: April 12, 2016 04:27 IST2016-04-12T04:27:46+5:302016-04-12T04:27:46+5:30
विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ एप्रिलपासून पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाआड पाणीपुरवठ्याची घोषणा केली होती. मात्र, याबाबत

दिवसाआड पाणी कपात लांबणीवर
पिंपरी : विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ एप्रिलपासून पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाआड पाणीपुरवठ्याची घोषणा केली होती. मात्र, याबाबत महापालिका, जलसिंचन, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक न झाल्याने तूर्ततरी हा कपात लांबणीवर पडली आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने मावळातील पवना धरणातील साठा कमी झाला आहे. त्यामुळे शहरात दिवसातून एकवेळ पाणीपुरवठ्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले होते. ही कपात ११ डिसेंबरपासून लागू करण्यात आली होती. या वेळी दहा टक्के पाणीकपात केली. त्यानंतर ११ मार्चला त्यात पाच टक्के वाढ करून पंधरा टक्के पाणी कपात केली आहे. दिवसाला बाराशे क्युसेक पाणी धरणातून सोडण्यात येत आहे. सध्या धरणात ३३ टक्के साठा असून, गेल्या वर्षीपेक्षा हा पाणीसाठा १५ टक्क्यांनी कमी आहे. पाणी साठा कमी झाल्याने पाटबंधारे विभागाने मे महिन्यात शेतीपंपाचेही पाणी बंद करणार असल्याचे सूचित केले आहे. पुण्यात यापूर्वीच दिवसाआड पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पवार यांनी एका कार्यक्रमात सूतोवाच केले होते. त्यामुळे एकवेळ पाणीपुरवठ्यातच कपात करणार की, दिवसाआड पाणी पुरवठा करणार, याबाबत पाणीपुरवठा विभागाने ही पाणीकपात कधीपासून लागू होणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)
पाणीकपातीविषयी चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात महापालिका अधिकारी, जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल. किती प्रमाणात पाणीकपात करायची यावर चर्चा होईल, त्यानंतर महापालिकेतील विविध पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा केली जाईल. त्यानंतर पाणीकपातीचा निर्णय जाहीर करण्यात येईल, असे आयुक्त राजीव जाधव म्हणाले.