रोजच्या वाहतूककोंडीने वडगावकर त्रस्त
By Admin | Updated: July 10, 2015 01:42 IST2015-07-10T01:42:03+5:302015-07-10T01:42:03+5:30
मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहराच्या मुख्य रस्त्यालगत खासगी वाहने बेशिस्तपणे उभी केली जातात.

रोजच्या वाहतूककोंडीने वडगावकर त्रस्त
वडगाव मावळ : मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहराच्या मुख्य रस्त्यालगत खासगी वाहने बेशिस्तपणे उभी केली
जातात. या बेशिस्त वाहनांमुळे रस्त्यावरून एसटी बस व एका वेळी दोन चारचाकी वाहने जाताना दैनंदिन वाहतूककोंडी निर्माण होत असल्याने वडगावकर त्रस्त झाले आहेत. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरात पंचायत समिती, तहसील, भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक, उपकोषागार, न्यायालय, कृषी, भात संशोधन केंद्र, सहायक निबंधक, पोलीस ठाणे, दवाखाने, बँक, शाळा, महाविद्यालय व बाजारापेठ असल्याने दैनंदिन हजारो नागरिक दुचाकी व चारचाकी वाहनाने ये-जा करतात.
मुख्य रस्त्यात दवाखाने, मंदिर, सहायक निबधंक, बँक व बाजारपेठ असल्याने या रस्त्याच्या दुतर्फा खासगी वाहने बेशिस्तपणे उभी केली जातात. त्यामुळे मोठी वाहने समोर एका वेळी आल्यास वाहतूककोंडी होते. वाहतूककोंडीतून जीव मुठीत घेऊन विद्यार्थी, महिला व नागरिकांना ये-जा करावी लागते. वाहतूककोंडी झाल्यास पोलिसांना बोलवावे लागते. तेव्हा वाहतूक सुरळीत होते. गुरुवारी राजकीय पक्षांची आंदोलने होतात. आठवडे बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते.
मे २०१३मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण कारवाई करून जागा मोकळी केली आहे. त्या जागेत खासगी वाहने बेशिस्त उभी केली जात आहेत. जुना मुंबई-पुणे महामार्ग ते पोलीस ठाणे रस्त्यात तहसील, भूमिअभिलेख, पोलीस ठाणे व पंचायत समिती ते रेल्वे स्टेशन रस्त्यावर पंचायत समिती, दुय्यम निबंधक, पोस्ट, न्यायालय, बँक, रेल्वे स्टेशन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने बेशिस्तपणे उभी केल्याने वाहतूककोंडी निर्माण होते. त्यातून किरकोळ व गंभीर अपघात होत आहेत. वाहतूककोंडी सुरळीत करण्यासाठी बेशिस्त वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करावी. स्वतंत्र वाहनस्थळ उभारावे. वडगाव शहरात वाहतूक नियत्रंण करण्यासाठी वाहतूक पोलीस नियुक्त करावा, अशा मागण्या होत आहेत.(वार्ताहर)