पिंपरी : अली एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मच्या नावाखाली एक कोटी ११ लाखाची सायबर फसवणूक करण्यात आली. सायबर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करत २४ तासांच्या आत पाच संशयितांना अटक केली.
फिर्यादी यांच्याशी व्हॉटस्अप नंबरवरून संपर्क करून ‘अली एक्स्प्रेस’ प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकीस १०-१५ टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला नफा दाखवून वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण १ कोटी ११ लाख रुपये भरायला लावले. मात्र, रक्कम काढताना शासन कर भरावे लागतील, असे सांगून पैसे अडवण्यात आले.
पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, प्रकाश कातकाडे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणावरून नागपूर येथे शरद दिलीप सराफ (४८, रा. हडपसर, पुणे) याला अटक केली. त्याच्या कबुलीनुसार सुरज सायकर (२८) व संकेत न्हावले (२४) यांना अनुक्रमे नागपूर व पुण्यातून ताब्यात घेतले.
पुढील तपासात नागेश गंगे (२८) व योगिराज जाधव (२९) यांनीही बँक खात्यांद्वारे फसवणुकीचे पैसे रोख स्वरूपात काढून यूएसडीटी क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतरित केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ती क्रिप्टो रक्कम विविध प्लॅटफॉर्मवर विकून भारतीय चलनात परावर्तित केली जात होती. याबाबत अधिक तपास सायबर पोलिस करीत आहेत.