मिरवणुकीसाठी अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2015 01:12 IST2015-09-27T01:12:49+5:302015-09-27T01:12:49+5:30

ढोल-ताशांचा टिपेला पोहचलेला गजर, आकर्षक फुलांची सजावट, चित्तथरारक मर्दानी खेळ, विविध वाद्यांच्या गजरात, भगवे फेटे परिधान केलेल्या लेझीम पथकासह मिरवणुकीने आपल्या लाडक्या

The crowd gathered for the procession | मिरवणुकीसाठी अलोट गर्दी

मिरवणुकीसाठी अलोट गर्दी

भोसरी : ढोल-ताशांचा टिपेला पोहचलेला गजर, आकर्षक फुलांची सजावट, चित्तथरारक मर्दानी खेळ, विविध वाद्यांच्या गजरात, भगवे फेटे परिधान केलेल्या लेझीम पथकासह मिरवणुकीने आपल्या लाडक्या गणरायांना मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला.
गेल्या दहा दिवसांपासून सगळीकडे गणेशोत्सवाचा आंनद सोहळा सुरू होता. या सोहळ्याची सांगता मोठ्या भक्तिभावात उत्साहात झाली. दर वर्षी अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी येथील सर्व मंडळांकडून गणरायाला निरोप दिला जातो. भोसरीतील गणपतीच्या विविध देखाव्यांबरोबर येथील मिरवणूकही प्रेक्षणीय ठरते. या वर्षी बहुतांशी मंडळांनी महिला व पुरुषांची ढोल- ताशांची विविध पथके आणली होती. पुणे व पिंपरी- चिंचवडच्या अनेक शाळांच्या या पथकांमुळे भोसरीत अतिशय उत्साही वातावरण निर्माण झाले होते. मुख्य मिरवणुकीस सायंकाळी साडेसहानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली.
मात्र, मुख्य विसर्जन मिरवणुकीत गुलाल व भंडाऱ्यांचा वापर टाळण्याचा प्रयत्न केलेला दिसत होता. लांडगे लिंबाची तालीम मंडळ, पठारे लांडगे तालीम मंडळ, फुगे माने तालीम मंडळ यांनी हलता जहाजाचा देखावा सादर केला होता. श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या भोजापूर राजा, खंडोबा आळीचे खंडोबा मित्र मंडळ, (माळाचा राजा) गव्हाणे तालीम, मधले फुगे तालीम मंडळ व लांडेवाडी येथील नवमहाराष्ट्र मित्र मंडळाने आकर्षक फुलांच्या सजावटीवर भर दिला होता.
मुख्य मिरवणूक शिस्तबद्धपणे सुरू होती. सायंकाळी साडेपाचनंतर भोसरी गावठाण व परिसरातील मंडळे मिरवणुकीसाठी बापुजीबुवा चौकात जमत होती. साडेसहानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली. वाजत-गाजत सुरू असलेला हा मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी भोसरीकर नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
मुख्य मिरवणुकीत ढोल-ताशांच्या खेळांच्या पथकांनी एकच रंगत आणली होती. महिला व मुलींच्या आकर्षक वेशभूषेसह भगवे फेटे परिधान केलेल्या मुला-मुलींची पथके खास आकर्षण ठरत होती. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. महापालिकेने बनविलेल्या हौदात, तर काही मंडळांनी अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारी असलेल्या विहिरीत विसर्जन करून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप
दिला. (वार्ताहर)

Web Title: The crowd gathered for the procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.