‘तालेरा’साठी ३९ कोटी खर्च, महापालिका रुग्णालयाचा होणार कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 05:13 IST2018-02-12T05:13:20+5:302018-02-12T05:13:27+5:30
चिंचवड येथे महापालिकेचे तालेरा रुग्णालय आहे. रुग्णालयाची जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या कामासाठी सन २०१७-१८च्या अर्थसंकल्पात २६ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

‘तालेरा’साठी ३९ कोटी खर्च, महापालिका रुग्णालयाचा होणार कायापालट
पिंपरी : चिंचवड येथे महापालिकेचे तालेरा रुग्णालय आहे. रुग्णालयाची जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या कामासाठी सन २०१७-१८च्या अर्थसंकल्पात २६ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या कामासाठी सल्लागार नेमून अर्थसंकल्प तयार करण्यात आला. त्याकरिता सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. मात्र, ही मान्यता घेताना अर्थसंकल्पातील सुधारित रक्कम २६ कोटींवरून थेट ७१ कोटी ५० लाखांवर नेण्यात आली. त्यास सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तालेरा रुग्णालयाच्या इमारतीबाबत चर्चा झाली. विषय पत्रिकेवर असणारा विषय मंजूर करण्यात आला. तालेरा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामासाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. निविदा दर ३९ कोटी ७७ लाख रुपये निश्चित करण्यात आला. चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी एस. एस. साठे या ठेकेदाराने निविदादरापेक्षा १.६० टक्के कमी म्हणजेच ३९ कोटी १३ लाख रुपये दर सादर केला. त्यानुसार साठे यांच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.