ठेकेदार पोसले जातात!
By Admin | Updated: July 16, 2014 04:09 IST2014-07-16T04:09:54+5:302014-07-16T04:09:54+5:30
मोशी कचरा डेपो येथे दुर्गंधीनाशक औषधफवारणी (ओडो फ्रेश) च्या फवारणीसाठी महापालिकेने भाडेकराराने एक ट्रॅक्टर घेतला आहे.

ठेकेदार पोसले जातात!
पिंपरी : मोशी कचरा डेपो येथे दुर्गंधीनाशक औषधफवारणी (ओडो फ्रेश) च्या फवारणीसाठी महापालिकेने भाडेकराराने एक ट्रॅक्टर घेतला आहे. त्याला वर्षाकाठी २६ लाख रुपये खर्च केले जातात. या रकमेत महापालिका अनेक ट्रॅक्टर खरेदी करू शकते. ठेकेदाराला पोसण्यासाठी असे भाडेकरार करण्याचा काहींनी घाट घातला आहे, असा आरोप स्थायी समिती सभेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी महेश लांडगे होते.
महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाकडील मोशी कचरा डेपो येथे जमा होणाऱ्या कचऱ्यावर बायोलॉजिकल ओडर कंट्रोल प्रक्रिया करण्यासाठी दुर्गंधीनाशक पुरविणे व औषध फवारणे या कामासाठी १ हजार ९४५ प्रतिलिटर दराने ओडो फे्रश खरेदी करण्याचा अवलोकनार्थ प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला. त्यावर चर्चा व्हावी, अशी मागणी आशा शेंडगे यांनी केली. ओडर कंट्रोल प्रक्रियेवर होणाऱ्या एकूण खर्चाबाबत महापालिका प्रशासनाकडे खुलासा मागितला.
महापालिकेने ओडरच्या फवारणीसाठी एक ट्रॅक्टर भाडेकराराने घेतला आहे. प्रतितास २४५ रुपये या दराने वार्षिक २६ लाख खर्चाचा भाडेकरार ठेकेदारासोबत करण्यात आला आहे. केवळ ठेकेदाराला सांभाळण्यासाठी भाडेकराराचा घाट घालण्यात आला आहे. त्यात अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. दुर्गंधीनाशकासाठी महापालिका एक लीटर मागे १ हजार २८० रुपये खर्च करते. फवारणीसाठी ट्रॅक्टर भाडेकराराने घेतला आहे.
मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव, डेंगीच्या रुग्णसंख्येत
होणारी वाढ, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तसेच खराळवाडी येथे स्कायवॉक तसेच भीमसृष्टी उभारण्याबाबतही स्थायी समितीमध्ये चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते, त्यामुळे मार्च २०१३ पर्यंत प्रशिक्षण घेतलेल्या सर्व महिलांना शिवणयंत्राचे वाटप करावे, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष महेश लांडगे यांनी दिले. (प्रतिनिधी)