‘सारथी’ असून खोळंबा
By Admin | Updated: October 19, 2015 01:50 IST2015-10-19T01:50:35+5:302015-10-19T01:50:35+5:30
नागरिकांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी, तसेच महापालिकेशी संबंधित विविध विभागांच्या सुविधेबाबत माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या

‘सारथी’ असून खोळंबा
मंगेश पांडे, पिंपरी
नागरिकांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी, तसेच महापालिकेशी संबंधित विविध विभागांच्या सुविधेबाबत माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सारथी’ हेल्पलाइन प्रकल्पाची स्थिती सध्या असून नसल्यासारखी झाली आहे.
तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेल्या सारथी हेल्पलाइनवर सुरुवातीला दिवसभरात सुमारे चारशे कॉल येत होते. त्यांच्या बदलीनंतर तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे कॉल येण्याचे प्रमाण चारशेहून अडीचशेवर आले आहे. अशातच आयुक्त राजीव जाधव यांनी ही सुविधा १ जानेवारीपासून चोवीस तास सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. यातून तरी व्यवस्थित सेवा मिळणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
‘सिस्टिम आॅफ असिस्टिंग रेसिडेन्टस अँड टुरिझम थ्रो हेल्पलाइन इन्फॉर्मेशन’ (सारथी) ही हेल्पलाइन १५ आॅगस्ट २०१३ ला सुरू झाली. यातून ४५ प्रकारच्या सुविधांची माहिती दिली जाते. यामध्ये ३२ सुविधा महापालिकेशी संबंधित आहेत. तर ११ केंद्र व राज्य शासनाशी, तर दोन खासगी क्षेत्राशी संबंधित आहे. या सुविधेमुळे प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन माहिती घेण्यासाठी जाणाऱ्या वेळेची बचत होईल, असा उद्देश होता.
डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांची खूप मोठी सोय झाली. माहिती घेण्यासह ठिकठिकाणच्या तक्रारीदेखील या हेल्पलाइनमार्फत अधिकाऱ्यांपर्यंत पोहचू लागल्या. एक कॉल केला, तरी समस्यांचे निराकरण होत होते. सुरुवातीला दिवसाला सुमारे चारशे कॉल येत होते. डॉ. परदेशी यांच्या बदलीनंतर ‘सारथी’वर करण्यात येणाऱ्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची तक्रार आहे. अशातच सकाळी सात ते रात्री दहा या वेळेत सुरू असणारी ही सुविधा आता चोवीस तास सुरू ठेवणार असल्याची घोषणा आयुक्त राजीव जाधव यांनी केली आहे.
‘सारथी हेल्पलाइन’बाबत नगरसेवकही नाराज
प्रभागात कुठलीही समस्या निर्माण झाली की, त्याची सोडवणूक करण्यासाठी नगरसेवकांच्या घरचे उंबरे झिजवावे लागायचे. यामुळे नागरिक व नगरसेवकांचा संपर्क यायचा. मात्र, नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सारथी’ हेल्पलाइन कॉल केल्यास तातडीने प्रश्न सुटत होते. त्यामुळे नागरिकांचे नगरसेवकांकडे जाण्याचे प्रमाणही कमी झाले. मतदार दूर जाऊ लागला होता. यामुळे नगरसेवकांनी ‘सारथी’बाबत अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, डॉ. परदेशी यांची बदली झाल्यानंतर सारथीवर तक्रार केली, तरी त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.