पक्षांतर्गत गटबाजीचे भाजपपुढे आव्हान
By Admin | Updated: August 14, 2014 04:19 IST2014-08-14T04:19:37+5:302014-08-14T04:19:37+5:30
भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघात गेली

पक्षांतर्गत गटबाजीचे भाजपपुढे आव्हान
पुणे : भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघात गेली २० वर्षे एकहाती असलेले प्रतिनिधित्वाबरोबरच दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या वाढलेल्या आकांक्षा यामुळे लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतरही या मतदारसंघात भाजपला पक्षांतर्गत गटबाजीचेच प्रामुख्याने आव्हान समोर असल्याचे दिसून येते़ त्याचबरोबर गेल्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेली जोरदार लढतही दुर्लक्षित करता येणार नाही़
लोकसभा निवडणुकीत अनिल शिरोळे यांना या मतदारसंघात तब्बल ५८ हजार ५३० मतांची आघाडी मिळाली होती़ विद्यमान आमदार गिरीश बापट हे कसबा मतदारसंघाचे १९९५ पासून नेतृत्व करीत आहेत़ गेल्या निवडणुकीत तिहेरी लढतीत बापट यांनी १८ हजार १६२ मतांनी विजय मिळविला होता़ बापट यांना ५४ हजार ९८२ मते मिळाली होती़ मनसेचे रवींद्र धंगेकर यांना ४६ हजार ८२० आणि काँग्रेसचे रोहित टिळक यांना ४६ हजार ७२८ मते मिळाली होती़
गेली २० वर्षे कसब्याचे नेतृत्व करत असल्याने पक्षातून तसेच अन्य ठिकाणाहून आता बदल हवा, अशी मोहीम गेल्या काही दिवसांपासून बापट यांच्या विरोधात राबविली जात आहे़ काहींनी आपल्याला संधी मिळावी, यासाठी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न सुरूकेला आहे़ लोकसभा निवडणुकीसाठी बापट इच्छुक होते़ पण, तिकीट मिळविण्यात अनिल शिरोळे यशस्वी झाले आणि खासदार झाले़ लोकसभा निवडणुकीत बापट यांनी काम केले नसल्याची तक्रार प्रचारप्रमुख प्रदीप रावत यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती़ त्याच वेळी कसब्यातील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वाचा वाटा उचलला होता़ तसेच या नेत्यांनी आता विनोद तावडे यांचे नेतृत्व मान्य केले आहे़ त्यामुळे नव्या समीकरणात आपल्यालाही संधी मिळेल, अशी या नेत्यांना आशा वाटत आहे़ भाजपकडून बापट यांच्यासह नगरसेवक गणेश बीडकर, मुक्ता टिळक, हेमंत रासने तसेच धीरज घाटे, मनीष साळुंके इच्छुक आहेत़
गेल्या निवडणुकीनंतर मनसे आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी पुढील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे़ निवडणुकीचा कोणताही अनुभव नसताना काँग्रेसकडून रोहित टिळक यांनी चांगली लढत दिली होती़ यंदाही ते इच्छुक आहेत़ त्यांच्यासह महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांच्यासह गोपाळ तिवारी, नीता रजपूत, वीरेंद्र किराड, नितीन गुजराती, अस्लम बागवान, शिवानंद हुल्याळकर, सतीश मोहोळ यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे़ कसब्यात बदल हवाय का, अशी मोहीम काँग्रेसमधील इच्छुकांनीही राबविली होती़ महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद आणि बहुजन चेहरा यामुळे शिंदे यांचे नाव चर्चेत आहे़ मात्र, त्या वेळी प्रदेश पातळीवर काम केलेले गोपाळ तिवारी, वीरेंद्र किराड, नीता रजपूत यांचेही नाव दुर्लक्षित येणार नाही़
भाजपच्या या बालेकिल्ल्यात पक्षाला तिरंगी निवडणुकीत यश मिळण्याची शक्यता आहे़ मात्र, त्याच वेळी पक्षांतर्गत गटबाजीला ते कसे तोंड देऊ शकतात, यावरच या मतदारसंघातील लढत रंगतदार ठरणार आहे़ (प्रतिनिधी)