बंडखोरी रोखण्याचे आव्हान

By Admin | Updated: October 14, 2016 05:45 IST2016-10-14T05:45:24+5:302016-10-14T05:45:24+5:30

मोशी व चिखली गावठाणाचा परिसर मिळून प्रभाग क्रमांक दोन झाला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर उच्चभ्रू सोसायट्यांची निर्मिती झाली

The challenge of preventing rebellion | बंडखोरी रोखण्याचे आव्हान

बंडखोरी रोखण्याचे आव्हान

पिंपरी : मोशी व चिखली गावठाणाचा परिसर मिळून प्रभाग क्रमांक दोन झाला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर उच्चभ्रू सोसायट्यांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे या प्रभागात उच्चभ्रूंचे मत निर्णायक ठरणार आहे. या प्रभागात तीन जागा या सर्वसाधारण गटासाठी राखीव असल्याने उमेदवारीसाठी इच्छुकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. बंडखोरी रोखण्याचे प्रमुख आव्हान राजकीय पक्षांसमोर असणार आहे.
महापालिकेच्या २०१२च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन म्हणजेच चिखली गावठाण, प्रभाग पाच म्हणजेच कुदळवाडी-चिखली, प्रभाग सहा म्हणजेच मोशी प्रभाग तयार झाला होता. पूर्वीच्या तीन प्रभागांचा मिळून प्रभाग क्रमांक दोन झाला आहे. नदी आणि प्रमुख रस्त्यांचा आधार घेऊन प्रभाग दोन तयार केला आहे. टेल्को कंपनीच्या सीमेवरील मोरया हॉटेलसमोरील रस्त्याने कुदळवाडी, पंचवटी स्कीम, चिखलीतील गणेश मंदिर स्मशानभूमी, पुढे इंद्रायणी नदीमार्ग, मोशी जकात नाका पूल, तेथून नाशिक-पुणे रस्त्याने मोशी गावठाण, कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत हा प्रभाग जोडला गेला आहे. पुढे संभाजीमहाराज चौक, सीएनजी पेट्रोल पंप, राजे शिवाजीनगर स्पाइन रस्त्याने टेल्को कंपनीसमोरील प्राधिकरणाच्या पुलासमोरील रस्त्यापर्यंतचा भाग या प्रभागात येतो.
गेल्या वेळी चिखली प्रभागातून राष्ट्रवादीच्या स्वाती साने, दत्तात्रय साने, कुदळवाडी प्रभागातून राष्ट्रवादीच्या साधना जाधव, मनसेचे राहुल जाधव, मोशी प्रभागातून राष्ट्रवादीच्या मंदा आल्हाट आणि शिवसेनेचे धनंजय आल्हाट हे निवडून आले होते.
यंदाची प्रभागरचना करताना मोशी आणि चिखलीचे दोन भाग केले आहेत. एक भाग प्रभाग एकला जोडला आहे. कुदळवाडी प्रभागाचीही मोडतोड केली आहे. मोशीतील अर्धा भाग दुसऱ्या प्रभागाला जोडला आहे. या परिसरात कामगार, कष्टकरी मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय असा संमिश्र नागरिक वास्तव्यास आहे. स्थानिकांपेक्षा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे उच्चभ्रूंचे मतदान निर्णायक ठरणार आहे. स्थानिकांच्या राजकारणास लगाम घालण्याचे काम या प्रभागाच्या रचनेत केले आहे.
आरक्षणांचा रखडलेला विकास, महापालिका आणि प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे हे येथील प्रश्न आहेत. गतनिवडणुकीत या प्रभागातून राष्ट्रवादीला चार, मनसेला एक आणि शिवसेनेला एक जागा मिळाली होती. या वेळी या प्रभागात तीन जागा या सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. त्यामुळे खुल्या गटातील इच्छुकांची चांदी होणार आहे. या प्रभागातील एक जागा ही ओबीसी महिला गटासाठी राखीव आहे. त्यामुळे सर्वसाधारण गटातील इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस,
भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रमुख पक्षांना बंडखोरी रोखण्याचे प्रमुख आव्हान आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The challenge of preventing rebellion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.