शहरात फसवणुकीच्या घटनांचा उच्छाद
By Admin | Updated: March 23, 2017 04:23 IST2017-03-23T04:23:50+5:302017-03-23T04:23:50+5:30
कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून, विश्वासाने दिलेले दागिने परत देण्यास नकार देऊन, तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली

शहरात फसवणुकीच्या घटनांचा उच्छाद
पिंपरी : कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून, विश्वासाने दिलेले दागिने परत देण्यास नकार देऊन, तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली आहे, असे भासवून वेगवेगळ्या घटनांमध्ये फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत, तर सांगवी पोलीस ठाण्यात एका आरोपीविरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
बँकेचे कर्ज मिळवून देतो म्हणून चार जणांची चार लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचा गुन्हा माऊली ऊर्फ निशाद सावंत (वय २८, रा. महेशनगर) या आरोपीविरोधात दाखल करण्यात आला आहे. श्याम काळोखे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
काळोखे यांच्याकडून ४९ हजार रुपये, अजय मर्दान यांच्याकडून ३० हजार रुपये, राकेश जाधव यांच्यांकडून २० हजार, सुनील दोंदे यांच्याकडून ३ लाख, संगीता उन्हाळे यांच्याकडून ३० हजार रुपये घेतले. मात्र कोणत्याही बँकेचे कर्ज मंजूर करून दिले नाही. त्यामुळे फिर्यादींनी गुन्हा दाखल केला
आहे.
सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम विश्वासाने ठेवण्यास दिली. परंतु हा मुद्देमाल परत दिला नाही. सुमारे ९५ हजार रुपयांचा अपहार केला. या आरोपाची तक्रार शहाना मोहम्मद (वय ३६, रा. नेहरूनगर) यांनी सामी जाफर मिर्झा या आरोपीविरोधात दाखल केली आहे. सृजन फूड इंजिनिअरिंग कंपनीत कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीच्या ४७ हजार ८२३ रुपयांचा अपहार झाला. या प्रकरणी माधुरी घाटपांडे (वय २८, कोथरूड) यांनी श्रीकृष्ण विनायक ओझर या आरोपीविरोधात एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. रामनगरमध्ये मोबाइल दुकान फोडून ३१ हजार १९५ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला.
ही घटना रामनगर, दातीर पाटील कॉलनीत घडली. राहुल पाटील यांनी याप्रकरणी विशाल नामदेव गुंजाळ या आरोपीविरोधात तक्रार दिली आहे.
घरात शिरून ५० हजारांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही म्हणून अज्ञात आरोपीने फिर्यादी महिला व तिच्या आईला शिवीगाळ, मारहाण केली. जयश्री पिसाळ यांनी याप्रकरणी सांगवी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
अपहारप्रकरणी प्रकरणी तिघांवर गुन्हा-
पिंपरी : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून बनावट व्यवहार करण्यासह बँकेतून बनावट कर्ज व्यवहार करून आठ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेच्या अध्यक्ष, सचिवासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष सुरेश विठ्ठल जाधव (रा. चिखली), सचिव शाबुद्दीन जाफरभाई मणेर (रा. खंडोबानगर, बारामती), सेल्समन युवराज चिमणलाल शहा (रा. चिखलीगाव) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भगवान बोत्रे (वय ७, रा. देहूगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपींनी दीपक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून बनावट व्यवहार नोंदविले. खोटी व दिशाभूल करणारी माहिती सादर करून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतून बनावट कर्जव्यवहार केले. धान्य दुकानामध्ये हिशेब व जमा-खर्च ठेवला नाही.
संस्थेची इमारत, गाळे यांचे नोंदणीकृत भाडेकरार न करता त्यांनी दिलेले भाडे व डिपॉझिटच्या रकमांचा हिशेब न ठेवता त्याची रक्कम स्वत:च्या वैयक्तिक खात्यामध्ये भरली. संस्थेचा व संस्थेच्या सभासदांचा विश्वासघात करून एकूण सात लाख ९८ हजार ५३९ रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.