नारायण बडगुजर
पिंपरी : वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र सून्न आहे. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळामुळे वैष्णवीने आत्महत्या केली. या प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना मदत करणाऱ्या संकेत चोंधे याच्या कुटुंबाचा धक्कादायक कारनामा समोर आला आहे. चोंधे याच्यावर मंगळवारी रात्री अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हे नवे प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
वैष्णवी हगवणेने आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे हे फरार होते. बरेच दिवस हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी पलायन करत होते. यात संकेत चोंधे (रा. भुगाव, ता. मुळशी) याने त्यांना मदत केली होती. त्यांनी या दोघांना फिरायला थार कार दिली होती. हे थार कार बावधन पोलिसांनी जप्त केली आहे. याच संकेतच्या भावाच्या पत्नीने चोंधे कुटुंबावर धक्कादायक आरोप केले आहेत. पतीने फोनवरून धमकी दिल्या प्रकरणी तिने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार तिच्या पतीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. बावधन पोलिसांनी याप्रकरणी तिचा पती सुयश चोंधे याला नोटीस दिली आहे.
दरम्यान, सुयशच्या पत्नीने चोंधे कुटुंबावर धक्कादायक स्वरुपाचे आरोप केले आहेत. या प्रकरणी सुयस चोंधे याच्याविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच पतीविरोधात महिला आयोगाकडेही तक्रार केली होती.
लाल दिवा लावून फिरवली गाडी
चोंधे यांनी गाडीवर लाल दिवा लावून गाडी फिरवल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. याप्रकरणी देखील पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.