कारभाऱ्यांच्या हाती धुपाटणे

By Admin | Updated: November 11, 2016 01:47 IST2016-11-11T01:47:32+5:302016-11-11T01:47:32+5:30

पंतप्रधान मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या अचानक जाहीर केलेल्या निर्णयाने ‘लाटलेला लाखो रुपयांचा मलिदा’ कसा उघड करणार

Carmaker | कारभाऱ्यांच्या हाती धुपाटणे

कारभाऱ्यांच्या हाती धुपाटणे

देहूरोड : पंतप्रधान मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या अचानक जाहीर केलेल्या निर्णयाने ‘लाटलेला लाखो रुपयांचा मलिदा’ कसा उघड करणार, असा प्रश्न जमिनीच्या व्यवहारात भावा-बहिणींच्या हिश्श्यातून गोलमाल करून हात मारलेल्या रावेत, किवळे, गहुंजे व सांगवडे पंचक्रोशीतील काही कारभाऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे. या कारभाऱ्यांची अवस्था ‘तेलही गेले अन् तूपही गेले; हाती धुपाटणे आले’ अशीच झाली आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांत वाडवडिलांनी सांभाळलेली घरची जमीन विकताना कुटुंबातील काही कारभाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गोलमाल करून जवळच्या रक्तातील नात्यांतील, तसेच सख्ख्या बहीण-भावांच्या हिश्श्यातला मलिदा लाटला होता. कारभाऱ्यांनी सख्ख्या नात्यांत मलिदा लाटण्याचे काम केले असल्याने विविध कुटुंबांत वडील-मुलगा, भाऊ—भाऊ, बहीण-भाऊ, वडील-चुलता, आत्या (मावळण) अशा विविध रक्ताच्या नात्यांत दुरावा पडलेला आहे. दुसऱ्यांच्या हिश्श्याचा लाटलेला मलिदा घरात अगर सुरक्षित ठिकाणी (बँक नव्हे) ठेवून चाखण्याची कामे जोमात सुरु असताना अचानक नोटा रद्दचा निर्णय झाल्याने अशा कारभारी मंडळींची झोप उडाली आहे. गेले दोन दिवस असे कारभारी सैरभैर झाले आहेत. वकील व सनदी लेखापाल यांच्या कार्यालयाकडे प्रसंगी घराचे उंबरे झिजवत आहेत. मात्र मोठी रक्कम दाखविणार कशी, हा प्रश्न सुटेनासा झाला आहे.
एका कारभाऱ्याने तर जमीन विकताना बहिणीला खुशीने फक्त पाच लाख देण्याचे कबूल केले होते. मात्र तेही दिले नाहीत. उलट तिला पाच लाख द्यायला लागू नये, तिच्याबद्दल काही नातेवाइकांत अपप्रचार केला असून, त्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. तिच्याकडे जाणे-येणे बंद करून तिच्याशी बोलणे सोडून दिले आहे. दुसऱ्या एका कारभाऱ्याने जमीन विकल्यानंतर जमिनीची खरी किंमत न सांगता त्यातील लाटलेली रक्कम व संपूर्ण व्यवहारातील काळा पैसा भावा-बहिणींना न दाखवता लाटला. मात्र, आता हा काळा पैसा कसा उघड करणार, असा प्रश्न पडला आहे. पैश्याच्या हव्यासापोटी नातीही तुटली आणि आता लाटलेला हा पैसाच मातीमोल झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Carmaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.