मजुरांच्या डोक्यावर असुरक्षिततेचे ओझे
By Admin | Updated: July 13, 2015 04:10 IST2015-07-13T04:10:20+5:302015-07-13T04:10:20+5:30
मजुरांना सुरक्षा पुरविली नसतानाच शहर व लगतच्या भागांमध्ये बांधकामे सुरू आहेत. धोकादायक स्थितीतच काम करण्यास भाग पाडून अनेक मजले बांधले जात

मजुरांच्या डोक्यावर असुरक्षिततेचे ओझे
अंकुश जगताप, पिंपरी
मजुरांना सुरक्षा पुरविली नसतानाच शहर व लगतच्या भागांमध्ये बांधकामे सुरू आहेत. धोकादायक स्थितीतच काम करण्यास भाग पाडून अनेक मजले बांधले जात असल्याने मजुरांचा जीव धोक्यात पडत आहे. याबाबत काही बांधकाम व्यावसायिक व वैयक्तिक बांधकामे करवून घेणारे मालक कमालीची बेफिकिरी दाखवीत असून, प्रशासनही केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.
शहर व परिसरामध्ये बांधकामांना पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी, रावेत, मामुर्डी, काळेवाडी, भोसरी, मोशी, चिखली, ताथवडे, सांगवी आदी भागांत बांधकामांचा सपाटा सुरू आहे. पण, येथे अनेक मोठ्या गृहप्रकल्पांवर अथवा बहुतांश घरगुती बांधकामांवर काम करताना सुरक्षेची कोणतीच खबरदारी घेतली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. वास्तविक बांधकाम सुरू असणाऱ्या इमारतीच्या चोहोबाजूने बांबू, लोखंडी पाइपचा वापर करून केलेल्या पहाडाच्या ठिकाणीच मजबूत सुरक्षाजाळी बसविणे गरजेचे आहे. काम करताना तोल जाऊन मजूर खाली पडलाच, तर ही जाळी असल्यास जीवितास होणारा धोका टळतो. कामगार बचावले जातात.
बऱ्याच वेळा वरच्या मजल्यावरून बांधकामाचा राडारोडा अथवा बांधकाम साहित्य खाली पडते. अशा वेळी खाली काम करणाऱ्या मजुरांवर ते पडल्यास त्यांना मोठी दुखापत होण्याचे, बऱ्याचदा त्यांचा बळी जाण्याचे प्रसंग झाले आहेत. अशा ठिकाणी राडारोडा टाकण्यासाठी एका बाजूस लोखंडी पिंप जोडून केलेल्या निचरावाहिनीची गरज आहे. दुसरीकडे काम करताना हेल्मेट, हातमोजे, गमबूट आदी कोणतीच सुरक्षा साधने पुरविली जात नसल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे किरकोळ दुखापतींचा सामना करावा लागून, तो खर्च सोसण्याची वेळ मजुरांवर येत आहे.
बांधकाम सुरू असणाऱ्या इमारतींचे जिने अर्धवटच असतात. पायऱ्यांच्या बाजूला कोणतीच सुरक्षाजाळी अथवा कठडे तयार केलेले नसतात. तळमजल्यापर्यंतचा सज्जा रिकामाच दिसतो. अशा रिकाम्या जागेतही हंगामी स्वरूपाची सुरक्षाजाळी लावणे गरजेचे असते. मात्र, त्याकडे बांधकाम करवून घेणारे डोळेझाक करीत आहेत. मजूर दांपत्य कामात व्यस्त असताना जिन्यांच्या अशा धोकादायक ठिकाणी त्यांची मुले खेळत असतात.
अशा प्रसंगी तोल जाऊन पडल्यास मुलांच्या जिवास गंभीर धोका आहे. विटा, सिमेंट व इतर बांधकाम साहित्याची डोक्यावरून वाहतूक करण्यासाठी या जिन्यांमधून महिलांना वरच्या मजल्यापर्यंत अनेकदा ये-जा करावी लागते. अशा वेळी तोल जाऊन पडल्याने मजुरांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
प्रशासनाने याबाबत ठोस कारवाई करण्याबाबत चालढकल धोरण अंगीकारल्याचा प्रत्यय येत आहे. कार्यस्थळी सुरक्षित वातावरण मिळण्याची अपेक्षा मजुरांनी व्यक्त केली आहे.