बीआरटी रस्ता बनलाय मद्यपींचा अड्डा
By Admin | Updated: June 24, 2016 01:49 IST2016-06-24T01:49:22+5:302016-06-24T01:49:22+5:30
शहरातील वाढते गुन्हेगारी, दिवसाआड खुनाचे प्रकार, महिलांची छेडछाड, वाहनांची तोडफोड यांसह अनेक प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास पोलीस यंत्रणा हतबल झाली की काय

बीआरटी रस्ता बनलाय मद्यपींचा अड्डा
रहाटणी : शहरातील वाढते गुन्हेगारी, दिवसाआड खुनाचे प्रकार, महिलांची छेडछाड, वाहनांची तोडफोड यांसह अनेक प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास पोलीस यंत्रणा हतबल झाली की काय, असा प्रश्न नागरिकांना सातत्याने
सतावत आहे. मात्र, असे प्रकार दिवसेंदिवस घडत असताना मात्र पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प नसल्याचेच दिसून येत आहे.
अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी देऊनही वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत भर रस्त्यावर दारू पिण्याचे धाडस मद्यपी करताना दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणारे नागरिक, परिसरातील रहिवासी कमालीचे वैतागले आहेत. या ठिकाणी महिलांना छेडछाडीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये एक प्रकारचे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या प्रकारात पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
वाकड पोलीस स्टेशन अपवाद ठरले आहे. थेरगाव येथील धनगरबाबा मंदिरासमोर दारूचे दुकान आहे. शेजारीच आनंद पार्क हौसिंग सोसायटी आहे. या सोसायटीत हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. तरीही अनेक मद्यपी त्या ठिकाणाहून दारूची बादली, पाणी ग्लास घेऊन फुटपाथवर जागा मिळाले. मद्यपी घोळक्या-घोळक्याने बसलेले निदर्शनास पडत आहे. त्यामुळे अनेक वेळा महिलांची छेडछाड काढण्याचे प्रकारही होत आहेत. एखाद्या महिलेला पाहून अश्लील भाषेत संभाषण करणे, तसेच आपापसात बाचाबाचीचे प्रकार घडत आहेत, तर काही वेळा भांडणे होत आहेत. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करताना ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्यांवरसुद्धा दारू पिली जाते. त्या हातगाड्यांवर मोठ्या प्रमाणात घोळका जमा झालेला असतो. अनेक वेळा या हातगाड्यांवर भांडणाचे प्रकार झालेले आहेत. सायंकाळी ७ ते रात्री ११च्या दरम्यान सुरू असतो. सायंकाळी अगदी वर्दळीच्या वेळी हा प्रकार सुरू असल्याने परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. (वार्ताहर)