बोपखेल तरंगता पूल आठ दिवस बंद
By Admin | Updated: January 26, 2016 01:39 IST2016-01-26T01:39:00+5:302016-01-26T01:39:00+5:30
बोपखेल येथे कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंगमार्फत (सीएमई) उभारण्यात आलेला तरंगता पूल दुरुस्तीसाठी आठ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

बोपखेल तरंगता पूल आठ दिवस बंद
पिंपरी : बोपखेल येथे कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंगमार्फत (सीएमई) उभारण्यात आलेला तरंगता पूल दुरुस्तीसाठी आठ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीनंतर पुन्हा हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील दापोडीहून बोपखेलगावात जाणारा रस्ता मे २०१५ ला सीएमई प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला. दरम्यान, सीएमईकडून बोपखेलमध्ये मुळा नदीवर तात्पुरता तरंगता पूल उभारण्यात आला. या पुलावरून छोटी वाहने आणि पादचारी खडकीमार्गे दापोडीला येतात. मात्र, मोठ्या वाहनांना सुमारे चौदा किलोमीटरचा वळसा घालून दिघीमार्गे दापोडी व आजुबाजूच्या परिसरात जावे लागते. त्यामुळे दापोडी ते बोपखेल हा रस्ता खुला करावा अथवा पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, तरंगत्या पुलालगतच कायमस्वरूपी पूल उभारण्याचे नियोजन आहे. मात्र, तोपर्यंत तरंगत्या पुलाचाच वापर करावा लागणार आहे.
दरम्यान, या तरंगत्या पुलाचे सात फ्लोट्स खराब झाल्याने त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. या कामासाठी २७ जानेवारी ते ३ फेबु्रवारी या आठ दिवसांच्या कालावधीसाठी हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत सीएमईचे कर्नल संदीप सोनी यांना महापालिकेस कळविले असल्याची माहिती उपअभियंता विजय भोजने यांनी दिली. दुरुस्तीनंतर हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)