नगरसेवकांच्या उपद््व्यापाचे खापर फुटते ‘शिक्षण मंडळा’वर
By Admin | Updated: November 10, 2015 01:45 IST2015-11-10T01:45:41+5:302015-11-10T01:45:41+5:30
स्थायी समितीत कोण कोणाच्या मार्फत प्रस्ताव, उपसूचना पाठवते, त्याचा थांगपत्ता शिक्षण मंडळ पदाधिकाऱ्यांना नसतो

नगरसेवकांच्या उपद््व्यापाचे खापर फुटते ‘शिक्षण मंडळा’वर
पिंपरी : स्थायी समितीत कोण कोणाच्या मार्फत प्रस्ताव, उपसूचना पाठवते, त्याचा थांगपत्ता शिक्षण मंडळ पदाधिकाऱ्यांना नसतो. इतरांच्या उपद्व्यापामुळे चुकीच्या कामाचे खापर शिक्षण मंडळावर फोडले जाते. महापालिका विद्यार्थ्यांसाठी केंब्रिज विद्यापीठाचा इंग्रजी संभाषण वर्ग सुरू करण्याच्या उपसूचनेमुळे शिक्षण मंडळाच्या आडून अन्य कोणी तरी फायदा उठवत असल्याचे निदर्शनास आले आहे, असे शिक्षण मंडळाचे सभापती चेतन घुले यांनी नमूद केले.
महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंब्रिज विद्यापीठाचा इंग्रजी संभाषण वर्ग सुरू करण्यासाठी एक कोटीची तरतूद करावी, अशी उपसूचना ३ नोव्हेंबरच्या स्थायी समितीत मंजूर झाली. नेमका प्रस्ताव काय आहे? शिक्षण मंडळासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमासाठी शिक्षण मंडळ पदाधिकारी, सदस्य यांना विश्वासात घेतले जात नाही. केंब्रिज विद्यापीठाच्या इंग्रजी संभाषण वर्गाबद्दल शिक्षण मंडळाचे पदाधिकारी अनभिज्ञ आहेत. शिक्षण मंडळाच्या कोणालाही विश्वासात न घेता, स्थायी समितीत परस्पर उद्योग केले जात आहेत. असे प्रस्ताव, उपसूचना सुरुवातीला शिक्षण मंडळाकडे पाठविणे गरजेचे आहे. शिक्षण मंडळाच्या शिफारशीनंतर असे प्रस्ताव, उपसूचना पुढे स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेकडे पाठवले गेले पाहिजेत. इतरांच्या उपद्व्यापामुळे शिक्षण मंडळ चर्चेत येते, ही वस्तुस्थिती उघड होऊ लागली आहे.
या प्रकरणी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे यांच्याशी संपर्क साधला असता, पुणे महापालिकेच्या धर्तीवर काही सदस्यांनी हा महापालिका विद्यार्थ्यांना केंब्रिज विद्यापीठाचा इंग्रजी संभाषण वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव आणला आहे. त्यासाठी एक कोटीची तरतूद करावी, अशी उपसूचना काही सदस्यांनी मांडली. ती मंजूर झाली आहे. निधीची तरतूद करावी, अशी उपसूचना होती. आर्थिक विषयांना मंजुरी देण्याचे अधिकार स्थायी समितीला असल्याने निधीची तरतूद करण्याची उपसूचना स्थायी समितीकडे आली. पुण्याच्या धर्तीवर महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असा शैक्षणिक उपक्रम राबवायला हरकत नाही.(प्रतिनिधी)