त्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद
By Admin | Updated: February 19, 2016 00:22 IST2016-02-19T00:22:20+5:302016-02-19T00:22:20+5:30
राज्याचा आरोग्य विभाग, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, जिजाई प्रतिष्ठान आणि रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरीतील आरोग्य महाशिबिरात

त्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद
पिंपरी : राज्याचा आरोग्य विभाग, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, जिजाई प्रतिष्ठान आणि रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरीतील आरोग्य महाशिबिरात मोफत उपचार झाल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे दिसून आले.
पिंपरी येथील एच. ए. मैदानावरील मोफत शिबिरासाठी सोळा हजार रुग्णांची नोंदणी झाली आहे. तीन हजार जणांची नेत्रतपासणी आणि चष्म्याचे वाटप करण्यात आले. ६० बालकांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. याशिवाय जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळू हे व्यंग असलेल्या चार बालकांवर जिल्हा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय देशमुख यांनी दिली. पालकमंत्री गिरीश बापट यांनी भेट दिली.
संयोजक आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ‘‘मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर आहे. त्यात सहभागी होऊन गरीब रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. शुक्रवारी शिबिराचा समारोप होणार आहे.’’
या वेळी भाजपा नेते सारंग कामतेकर, नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे, माजी नगरसेवक शंकर जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय देशमुख उपस्थित होते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय देशमुख म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच आयोजित केलेल्या या आरोग्य महाशिबिरात १७ मोठ्या रुग्णालयांनी सहभाग घेतला. या रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया, मोफत अँजीओग्राफी, मर्यादित अपंगांना जयपूर फूट व कॅलीपर्सचे वाटप, चष्मे व श्रवणयंत्रांचे वाटप, हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया, दंतरोग, नेत्ररोग, त्वचाविकार, हाडांचे आणि मणक्यांचे आजार, श्रवणदोष, प्लॅस्टिक सर्जरी, आयूष, किडनी व मूत्रमार्गाचे विकार यांविषयी उपचार आणि तपासणी केली.’’
मोफत उपचार झाल्याने रुग्ण आणि नातेवाइकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. (प्रतिनिधी)