महायुतीची भाजपाला उपरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 03:55 IST2016-07-09T03:55:50+5:302016-07-09T03:55:50+5:30

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेशी युती करायची किंवा नाही, याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्वयंसेवकांनी शहरात सर्वेक्षण केले. त्यानुसार महापालिकेत

BJP leader of Mahayuti | महायुतीची भाजपाला उपरती

महायुतीची भाजपाला उपरती

पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेशी युती करायची किंवा नाही, याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्वयंसेवकांनी शहरात सर्वेक्षण केले. त्यानुसार महापालिकेत सत्तेसाठी सेनेशी युती आवश्यकता आहे, असा सूर आहे. या ‘संघनीती’मुळे भाजपाच्या नेत्यांना शिवसेनेशी युतीची उपरती आल्याची चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील घडामोडीवर विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काही दिवसांपूर्वी शहरात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही शहरातील दौरे वाढले आहेत. त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
महापालिकेत सत्ता आणण्यासाठी रणनिती ठरविण्यासाठी संघाच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांचे मत जाणून घेतले. या वेळी महापालिकेत सत्तेसाठी भाजपची शिवसेनेशी युती आवश्यक आहे, अशी मते व्यक्त झाले. त्यामुळे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी युतीसाठी शिष्टाई केली आहे. भाजपाने युतीबाबतचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टाकला आहे. याबाबत स्थानिक पातळीवर खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी युतीबाबत विचारले असता, ‘युतीबाबत बोलण्याचा आणि भूमिका घेण्याचा अधिकार पक्षप्रमुखांचा आहे. ते निर्णय देतील तो मान्य राहील, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

पवार-पॉवर : युतीला बसणार खोडा?
युतीसाठी भाजपाने सेनेपुढे हात केला असला, तरी ही युती राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार होऊ देतील का? हा खरा प्रश्न आहे. राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणात पवारांची भूमिका, नीती महत्त्वपूर्ण ठरली आहे. अनेकदा त्यांची पॉवर काय, याची अनुभूती पिंपरी-चिंचवडकरांना आली आहे. त्यामुळे पवारांची पॉवर युती होऊ देणार का, हा खरा प्रश्न आहे.

भाजपची गूळमुळीत भूमिका...
राष्ट्रवादीविरोधात भाजपाच्या नेत्यांनी प्रखर भूमिका घेतलेली नाही. उलटपक्षी श्रेयवाद, राज्य किंवा केंद्राच्या प्रश्नांवरून भाजपा-सेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये जुंपत आहे. ‘पिंपरी-चिंचवडचा वरवर दिसणारा विकास ही सूज आहे, अशी टीका खासदारांनी केली आहे. ‘पिंपळे सौदागर, पिंपळे गुरवचा जसा विकास झाला, तसा पिंपरी, निगडी, चिंचवड, दापोडीमध्ये कसा झाला नाही? पिंपळे सौदागर, पिंपळे गुरवचा विकास कोणी केला, हे मी सांगण्याची गरज नाही, अशी भूमिका लक्ष्मण जगताप यांनी मांडली.

स्थानिक नेत्यांचे पटणार?
भाजपा व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी युतीचा निर्णय घेतला, तरी स्थानिक पातळीवरील नेत्यांची मने जुळणार का? हा खरा प्रश्न आहे. २००९च्या विधानसभा निवडणुकीपासून एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे भाजपाचे लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांची मने जुळणार का? जागा वाटपाचा फॉर्मुला काय आणि कसा राहणार? असे अनेक प्रश्न आहेत. त्यावर युतीचे गणित सुटणार की फिसकटणार आहे.

Web Title: BJP leader of Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.