पिंपरी शहरातील नाट्यगृहांचा पडदा खालीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 03:06 IST2018-05-11T03:06:10+5:302018-05-11T03:06:10+5:30
शहरातील महत्त्वाच्या दोन नाट्यगृहांची कामे सुरू असल्यामुळे नाट्यरसिकांची गैरसोय झाली आहे. प्रा. रामकृष्ण मोरे आणि आचार्य अत्रे या दोन नाट्यगृहांच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ऐन सुटीच्या कालावधीत नागरिकांना नाटक वा इतर कार्यक्रमांपासून दूर राहावे लागत आहे.

पिंपरी शहरातील नाट्यगृहांचा पडदा खालीच
पिंपरी - शहरातील महत्त्वाच्या दोन नाट्यगृहांची कामे सुरू असल्यामुळे नाट्यरसिकांची गैरसोय झाली आहे. प्रा. रामकृष्ण मोरे आणि आचार्य अत्रे या दोन नाट्यगृहांच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ऐन सुटीच्या कालावधीत नागरिकांना नाटक वा इतर कार्यक्रमांपासून दूर राहावे लागत आहे.
शहरात चार नाट्यगृहे आहेत. त्यातील दोन नाट्यगृहांचे काम सुरू आहे, तर इतर दोन नाट्यगृहांमध्ये नाटकांचे प्रयोग होत नाहीत. त्यामुळे एकाच वेळी दोन मोठ्या नाट्यगृहांची कामे काढल्याने शहरातील नाट्यप्रेमींना नाटक पाहण्यासाठी पर्यायच उपलब्ध राहिला नाही. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह २ मेपासून नतूनीकरणाच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहे. तर संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरही दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात हे नाट्यगृह भुताटकीच्या घटनांमुळे चांगलेच चर्चेत आले होते. भुताटकीला घाबरून रंगमंदिरात अनेक पूजा-अर्चा करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यापूर्वीही या ठिकाणी नाटकांचे चांगले प्रयोग होत नव्हते. त्यात चिंचवडचे नाट्यगृह नूतनीकरणासाठी चार महिने बंद ठेवण्यात येणार असल्याने सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थांची व नाट्य कलाकारांची डोकेदुखी वाढली आहे. या दोन्ही नाट्यगृहांची कामे टप्प्याटप्प्याने करणे अपेक्षित होते. जेणेकरून नागरिकांना एक नाही तर एक पर्याय उपलब्ध झाला असता. या दोन्ही नाट्यगृहांसाठी मोठ्या प्रमाणावर दुरूस्तीचा खर्च करण्यात येणार आहे. चिंचवडच्या नाट्यगृहासाठी १८ कोटी रुपये तर आचार्य अत्रे नाट्यगृहासाठी ५ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
इतर दोन नाट्यगृहे असून नसल्यासारखीच आहे. नव्यानेच बांधण्यात आलेले सांगवीतील निळूभाऊ फुले नाट्यगृहामध्येही नाटकांचे प्रयोग घेतले जात नाहीत. तर भोसरीतील नाट्यगृहामध्ये केवळ छोटेमोठे कार्यक्रम सादर केले जातात.