बँक, एटीएम बंदमुळे गैरसोय
By Admin | Updated: November 15, 2016 02:58 IST2016-11-15T02:58:59+5:302016-11-15T02:58:59+5:30
गुरुनानक जयंतीच्या सुटीमुळे सोमवारी बँका बंद होत्या. शहरातील बहुतांश एटीएम मशिनही रक्कम नसल्याने बंद राहिल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना

बँक, एटीएम बंदमुळे गैरसोय
लोणावळा : गुरुनानक जयंतीच्या सुटीमुळे सोमवारी बँका बंद होत्या. शहरातील बहुतांश एटीएम मशिनही रक्कम नसल्याने बंद राहिल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला.
सकाळपासून नागरिक पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्रावर येऊन परत जात होते. स्टेट बँकेचे एटीएमही बंद राहिल्याने नागरिकांना निराशा पत्करावी लागली. ज्यांना आज बँक बंद आहे, याची माहिती नव्हती, असे लोक बँकांच्या बाहेरदेखील येऊन उभे राहत होते. चलनातून हजार व पाचशेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय लागू झाल्यानंतर मागील चार ते पाच दिवसांपासून सर्वच बँकांच्या बाहेर नागरिकांच्या पैसे भरण्यासाठी, तसेच बदलून घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत. चलनात पुरेसे सुटे पैसे नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या या संकटकाळात त्यांना सहकार्य करण्याऐवजी या संधीचा काही समाजकंटक फायदा घेत आहेत. सरकारने पेट्रोल पंप, रुग्णालये, मेडिकल दुकाने, दूध विक्री केंद्र, गॅस वितरण केंद्र, रेशनिंग दुकान आदी जीवनावश्यक ठिकाणी हजार व पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले असताना यामधील काही मंडळी नागरिकांची लूट करत परत देण्यास सुटे पैसे नाहीत, असे कारण देत नागरिकांना हजार व पाचशे रुपयांची खरेदी करण्याची सक्ती करत आहेत. पेट्रोल पंप व मेडिकल दुकानात या घटना सर्रास घडत आल्याने शासनाच्या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी मनस्ताप सहन करावा लागत आहे.
देहू बाजारपेठेत निरूत्साह
देहूगाव : येथील सर्व बॅँँका व एटीएम बंद असल्याने परिसरात बाजारपेठेत निरुत्साह दिसून आला. बॅँँकेत नोटा बदलण्यासाठी व पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे. आपलेच पैसे वेळेत व हव्या त्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने नाराजीचा सूर ऐकू येत आहे.
येथील काही एटीएम अद्यापही सुरू झाली नाहीत. एचडीएफसी व आयसीआयसी बॅँँकेचे एटीएम दोन दिवस सुरू केले होते. मात्र, तेथे पैसे काढण्यासाठी मोठी रांग लागते व काही तासांतच एटीएममधील पैसे संपत असल्याने पुन्हा पैसे येईपर्यंत ही एटीएम देखील बंद राहतात. त्यामुळे येथील बॅँँक आॅफ महाराष्ट्र शाखेमध्ये मोठी गर्दी होत आहे. ज्यांना अद्याप बॅँकेकडून नोटा बदलून मिळाल्या नाहीत, त्यांची मोठी तारांबळ उडत आहे. त्यांना हातउसनेदेखील कोणी देत नसल्याने व्यवहारात तेजी दिसून येत नाही. सुटी असल्याने व एटीएम बंद असल्याने बॅँकांपुढे शुकशुकाट होता. दोन दिवस सार्वजनिक सुटी असूनही लोकांची गैरसोय टाळण्यासाठी नोटा बदलून देण्याचे काम १२-१२ तास सुरू होते. आज बॅँक कर्मचाऱ्यांना काहीशी विश्रांती मिळाली आहे. बॅँकेत येत असलेल्या अपुऱ्या संख्येतील नोटांमुळे कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत होती. याचा परिणाम गावातील किरकोळ विक्रेते, दुकानदार, हॉटेल व्यवसाय, मोबाइल रीचार्ज यांच्यावर झाला आहे. (वार्ताहर)