बालाजीनगरात दारूअड्डे उद्ध्वस्त

By Admin | Updated: February 5, 2016 01:48 IST2016-02-05T01:48:55+5:302016-02-05T01:48:55+5:30

भोसरी येथील बालाजीनगरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यांवर भोसरी पोलिसांनी गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक छापा टाकला

Balaajinagara barracks destroyed | बालाजीनगरात दारूअड्डे उद्ध्वस्त

बालाजीनगरात दारूअड्डे उद्ध्वस्त

पिंपरी : भोसरी येथील बालाजीनगरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यांवर भोसरी पोलिसांनी गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक छापा टाकला. या छाप्यात पाच ठिकाणचे दारूअड्डे उद्ध्वस्त केले. या अवैध दारू व्यवसायाला विरोध करणाऱ्या महिलाही पोलिसांच्या मोहिमेत सहभागी झाल्या. यामध्ये दारू विकणाऱ्या दोघांना अटक केली आहे.
येथे सुरू असलेल्या बेकायदा दारूविक्री व्यवसायाविरोधात परिसरातील महिलांचा अनेक दिवसांपासून विरोध होता. लेखी तक्रारी दिल्या होत्या. याची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांच्यासह पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा अचानक बालाजीनगरात दाखल झाला. घराघरांची झडती सुरू झाली. कोम्बिंग आॅपरेशनप्रमाणे बालाजीनगरात पोलिसांनी कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी पाच ठिकाणचे दारू अड्डे उद्ध्वस्त केले. स्थानिक नगरसेविका सीमा सावळे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील अनेक महिला एकत्रित आल्या होत्या. हे दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी रणरागिणींनी पोलिसांना मदत केली.
छुप्या पद्धतीने बेकायदापणे दारू विक्री करणाऱ्यांच्या अड्ड्यावरील दारूसाठा नष्ट करण्यात आला. दारूने भरलेले कॅन नष्ट करण्यात आले. तर अवैध दारू विकणाऱ्या आशा बानू बादेला (वय ५२) आणि सत्त्वशीला काळे (वय ५०) या दोन महिलांना अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Balaajinagara barracks destroyed