पोलिसांना जाग; उत्पादनशुल्क सुस्तच
By Admin | Updated: July 22, 2015 03:06 IST2015-07-22T03:06:25+5:302015-07-22T03:06:25+5:30
पिंपरी-चिंचवड परिसरातील हातभट्टी दारूनिर्मितीचे आगार मानल्या जाणाऱ्या भाटनगरमध्ये उत्पादनशुल्क विभागाने छापे टाकून,

पोलिसांना जाग; उत्पादनशुल्क सुस्तच
पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरातील हातभट्टी दारूनिर्मितीचे आगार मानल्या जाणाऱ्या भाटनगरमध्ये उत्पादनशुल्क विभागाने छापे टाकून, दोन दिवसांपूर्वी छापा टाकला. मोठ्या प्रमाणावर दारू साठा नष्ट केल्याचेही सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर या विभागाची कारवाई सुस्त पडली. विशेष म्हणजे, मंगळवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्यापेक्षा कितीतरी अधिक दारूसाठा नष्ट केला.
‘लोकमत’ने गावठी दारूच्या उच्छादाविषयी चालविलेल्या मोहिमेची दखल घेऊन पोलिसांनी आज कारवाई केली. भाटनगरच्या घराघरांत शिरून पोलिसांनी प्लॅस्टिक ड्रम, कॅन, हांडे, पातेली रीती केली. दारूसाठा लपवून ठेवलेल्या जागांचा शोध घेऊन पोलिसांनी मंगळवारी ११ वाजेपर्यंत भाटनगर दारूसाठामुक्त केले. ‘रूट मार्च’साठी रॅपिड अॅक्शन फोर्स आणि पोलीस एकत्रित आले होते. सकाळी साडेनऊ वाजताच पोलीस पथके भाटनगरमध्ये दाखल झाली. पोलिसांना पाहताच भाटनगरमधील हातभट्टीविक्रेत्यांची तारांबळ उडाली. अनेक जण घरे उघडी ठेवून घराबाहेर निघून गेले. घराघरांत शिरून पोलिसांनी शोधमोहीम राबविली. घरांमध्ये; तसेच घरांच्या बाजूला सीमाभिंतीलगत अनेकांनी हातभट्टी तयार करण्याचे साहित्य लपवून ठेवले होते. पोलिसांनी कोपरान्कोपरा शोधून काढला. हातभट्टी तयार करण्यासाठी आवश्यक असे साहित्य ज्या ठिकाणी लपवून ठेवले होते, ती ठिकाणे शोधून काढून, हातभट्टीचा साठा नष्ट करण्यात आला.
प्लॅस्टिक; तसेच लोखंडी ड्रम, कॅन, पातेली आणि हांडे अशा ज्या ज्या वस्तूंमध्ये हातभट्टीचा साठा होता, तो ओतण्यात आला. भाटनगरमधील रहिवाशांची या कारवाईमुळे
पळापळ झाली.
विशेष म्हणजे, या कारवाईत महिला पोलिसांचाही सहभाग होता. सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सैफन मुजावर, सचिन निकम, किशोर जगदाळे यांच्या पथकाने धडक कारवाई केली.
उत्पादनशुल्क ई विभागाने भाटनगरमध्ये कारवाई केली आहे. आता भाटनगरमध्ये कोठेच हातभट्टीचा साठा आढळून येणार नाही, असा दावा १७ जुलैला केला होता. त्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना भाटनगरमध्ये मंगळवारी साडेनऊ ते अकरा या दीड तासाच्या कालावधीत भाटनगरच्या घराघरांतून दारूचे पाट वाहत असल्याचे पाहावयास मिळाले.(प्रतिनिधी)