अॅट्रॉसिटीला हात लावता येणार नाही
By Admin | Updated: October 13, 2016 02:11 IST2016-10-13T02:11:03+5:302016-10-13T02:11:03+5:30
समाजातील कुठल्याही जातीबद्दल बोलले तर जातिवाचकचा गुन्हा दाखल होऊ शकतो. दरम्यान, कुणालाही अॅट्रॉसिटी कायद्याला हात लावता येणार नाही

अॅट्रॉसिटीला हात लावता येणार नाही
दौंड : समाजातील कुठल्याही जातीबद्दल बोलले तर जातिवाचकचा गुन्हा दाखल होऊ शकतो. दरम्यान, कुणालाही अॅट्रॉसिटी कायद्याला हात लावता येणार नाही किंवा त्यात बदल करता येणार नाही, असे मत प्रा. सुषमा आंधारे यांनी व्यक्त केले.
दौंड येथे ‘आरक्षण, अॅट्रॉसिटी भ्रम आणि वास्तव’ या विषयांवर त्या बोलत होत्या. येथील भीमक्रांती सेनेच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने अॅट्रॉसिटी अॅक्ट जनजागरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
कोपर्डी येथील आमच्या भगिनीवर झालेल्या अत्याचाराचा आम्ही निषेधच करतो, परिणामी गुन्हेगारांना तातडीने फाशी झाली पाहिजे. राज्यात शैक्षणिक, सहकार, राजकारण या ठिकाणी मराठ्यांचे वर्चस्व आहे; परंतु प्रस्थापित मराठ्यांनी विस्थापित मराठ्यांचा कधीही विचार केला नाही, असे सांगून लालकृष्ण अडवाणी, अरविंद केजरीवाल, शरद पवार, राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर सुषमा आंधारे यांनी नाराजी व्यक्त केली.
सुरुवातीला भीमक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी प्रास्ताविक भाषण केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी भीमक्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले.(वार्ताहर)