पिंपरी : राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेला सुरुवात केली, तेव्हा शासनाच्या तिजोरीत निधी होता. आता तिजोरीतील पैसे संपत चालले आहेत. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थींना निकष लावण्यात येत असल्याचे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुतीला घरचा आहेर दिला.
पिंपरी-चिंचवड येथे अजंठानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते शनिवारी (दि. २२) करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, रिपाइंचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले की, महापालिकेच्या निवडणुका कधीही होतील. त्या पार्श्वभूमीवर महायुतीतील पक्षांनी एकत्र निवडणूक लढावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यात महायुतीचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. महायुतीची ताकद वाढलेली आहे. मोदींनी केलेला विकास महत्त्वाचा आहे. आम्ही सोबतच राहणार आहोत. मात्र, राज्यात लाडकी बहीण योजनेला सुरुवात केली, तेव्हा शासनाच्या तिजोरीत निधी होता. आता तिजोरीतील पैसे संपत चालले आहेत. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थींना निकष लावण्यात येत आहेत.
ते म्हणाले की, पुणे, मुंबई, ठाणे या मोठ्या शहरांत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या माध्यमातून गरिबांना पक्की घरे मिळत आहेत. सुरुवातीला १८० चौरस फुटाची घरे मिळत होती. त्यानंतर २४५ आणि आता ३०० चौरस फुटाची घरे मिळत आहेत. मात्र, आम्ही राज्य शासनाकडे कमीत ४५० चौरस फुटाची घरे असावीत, असा प्रस्ताव दिला आहे.
राज ठाकरे महायुतीत नकोतच..!
आठवले म्हणाले की, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकदा भेटले ते ठीक. मात्र, त्यांना वारंवार भेटणे हे काही बरोबर नाही. राज ठाकरे यांना महायुतीत घेणे बरोबर नाही. तसेही त्यांचा महायुतीला काय फायदा होत नाही. ते आले तर आम्हाला काय मिळणार? मित्रपक्षांनी आम्हाला विचारात घेतले पाहिजे.
परभणी, बीडमधील आरोपींवर कारवाई व्हावी
आठवले म्हणाले की, परभणीतील संविधान विटंबनाविरोधी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळायला उशीर होत आहे. जबाबदार पोलिसांवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.