दृश्य कलेबाबत अनास्था कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 01:29 IST2016-02-15T01:29:16+5:302016-02-15T01:29:16+5:30

आपल्याबरोबरच समोरच्या व्यक्तींचे स्वातंत्र्य जपण्याचे संस्कार आतापासूनच मुलांवर करा. हे संस्कारच त्यांना सर्वांशी आदराने वागण्याबाबत मार्गदर्शक ठरतील

The art of blindness prevails | दृश्य कलेबाबत अनास्था कायम

दृश्य कलेबाबत अनास्था कायम

पिंपरी : आपल्याबरोबरच समोरच्या व्यक्तींचे स्वातंत्र्य जपण्याचे संस्कार आतापासूनच मुलांवर करा. हे संस्कारच त्यांना सर्वांशी आदराने वागण्याबाबत मार्गदर्शक ठरतील, असे प्रतिपादन दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी येथे केले.
व्हीनस आर्ट फाउंडेशन, चंद्ररंग संस्थेच्या वतीने आलेल्या ‘एक चित्रकार की खोज में’ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर चित्रकार प्रा. प्रभाकर कोलते, महापौर शकुंतला धराडे, शंकर जगताप, शिक्षण मंडळ सभापती चेतन घुले, उपसभापती नाना शिवले, संयोजक अमर पाटील, अपूर्वा पाटील आदी उपस्थित होते.
पालेकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचा ‘कान’ सुंदर स्वरांना दाद देतो. परंतु आम्हाला अजून कलेबाबत ‘नजर’ आली नाही. चित्रकला, शिल्पकला आणि स्थापत्यकला यामध्ये कधी महाराष्ट्रातील मागच्या पिढीने रस घेतला नाही.
त्यामुळे राज्यातील थोर चित्रकारांचे काम नव्या पिढीपुढे आले नाही, याची खंत वाटते. कोल्हापूरच्या अंबाबाईचे मंदिर हेमाडपंती स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मात्र, ही कला कोठे लुप्त झाली? याला रसिकांची, शिक्षकांची कलावंतांशी संवाद साधण्याची उदासीनता कारणीभूत आहे. संगीताला जसे आपण सहज शरण जातो, तसे या कलांबाबत होत नाही. आपण शास्त्रीय अभिजात संगीत जेवढे ऐकले व समजून घेतले जाते, तेवढे दृष्यकलेबाबत केले जात नाही. त्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. धंदेवाईक चित्रपटांचे कौतुक होते.’’
परीक्षक प्रकाश वाघमारे, सतीश सुतार, सतीश काळे यांनी काम पाहिले. पाटील यांनी स्वागत केले, प्रतिमा जगताप यांनी सूत्रसंचालन केले, तर अपूर्वा पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: The art of blindness prevails