अठ्ठावीस कोटींच्या कामांना मंजुरी
By Admin | Updated: February 4, 2016 01:26 IST2016-02-04T01:26:49+5:302016-02-04T01:26:49+5:30
विविध विकासकामांसाठी येणाऱ्या सुमारे २८ कोटी ३४ लाख ८३ हजार रुपये खर्चास स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली.

अठ्ठावीस कोटींच्या कामांना मंजुरी
पिंपरी : विविध विकासकामांसाठी येणाऱ्या सुमारे २८ कोटी ३४ लाख ८३ हजार रुपये खर्चास स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये मुकाई चौक ते भक्तिशक्ती चौक या मार्गावरील प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाकरिता देखभाल-दुरुस्तीपोटी देण्यात येणाऱ्या रकमेपैकी १० कोटी ४७ लाख १० हजार रुपये अदा करण्यासही मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती अतुल शितोळे होते.
सांगवी फाटा येथे ग्रेड सेपरेटर व फ्लाय ओव्हर बांधण्यासाठी, तसेच सांगवीतील औंध रुग्णालय कर्मचारी वसाहत येथे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अतिथीगृह बांधण्याकरिता २ कोटी ८६ लाख ६० हजार रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. चिंचवड येथील आरक्षण क्रमांक २११ येथे व्यापारी केंद्र विकसित करण्यासाठी येणाऱ्या १ कोटी ४४ लाख ७० हजार रुपये खर्चाचा विषय मंजूर झाला. प्रभाग क्रमांक ११ येथील प्रबोधनकार ठाकरे उद्यानाची स्थापत्यविषयक कामे, नूतनीकरणासाठी ३२ लाख ६५ हजार रुपये खर्चाचा विषय संमत झाला. पिंपळे निलख, वाकड येथील मुळा नदीकाठची मुख्य गुरुत्ववाहिनी दुरुस्त करण्यासाठी ४४ लाख ५८ हजार रुपये खर्च येणार आहे. त्या खर्चासह आनंदनगर येथे रेल्वे डेपोच्या बाजूने सीमाभिंत बांधण्यासाठी येणाऱ्या ९४ लाख २५ हजार रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. प्रभाग क्रमांक ६४ आणि प्रभाग क्रमांक ३९ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे प्रेक्षक गॅलरी बांधण्यासाठी येणाऱ्या ५१ लाख १४ हजार रुपये खर्चास मान्यता दिली. (प्रतिनिधी)