...अन् ‘त्या’ मातेचा झाला पुनर्जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:51 IST2017-08-11T02:51:31+5:302017-08-11T02:51:31+5:30
वेळ सायंकाळी ५.३०. ठिकाण मोशी खडी मशिन परिसर. या परिसरात खेळत असलेल्या तीन वर्षांच्या मुलाला एक गाय शिंगाने मारत आहे, हे दृश्य तिथेच झोपडीत असणाऱ्या त्या मुलाच्या सहा महिन्यांच्या गरोदर आईने पाहिले. मुलाचा जीव वाचवण्याच्या धडपडीत या माउलीला आपण गरोदर आहोत याचेही भान राहिले नाही.

...अन् ‘त्या’ मातेचा झाला पुनर्जन्म
भोसरी : वेळ सायंकाळी ५.३०. ठिकाण मोशी खडी मशिन परिसर. या परिसरात खेळत असलेल्या तीन वर्षांच्या मुलाला एक गाय शिंगाने मारत आहे, हे दृश्य तिथेच झोपडीत असणाऱ्या त्या मुलाच्या सहा महिन्यांच्या गरोदर आईने पाहिले. मुलाचा जीव वाचवण्याच्या धडपडीत या माउलीला आपण गरोदर आहोत याचेही भान राहिले नाही. पळतच जाऊन तिने मुलाला उचलले, पण मुलाकडे झेपावत असलेल्या गाईने आपला मोर्चा या गरोदर मातेकडे वळवला आणि गाईने तिला शिंगांवर घेऊन दूर फेकले. गाईच्या धारदार शिंगांमुळे बाईच्या पोटातील आतडे बाहेर पडले. रक्ताचा सडा पडला अन् क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. बघ्यांचे मन सुन्न करणारी ही घटना घडली.
जवळपासच्या नागरिकांनी जखमी अंजू बन्सल (वय २६, मूळ रा. सटाणा, मध्यप्रदेश) हिला तत्काळ वायसीएम रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत सहा वाजून गेले होते. रुग्णालयातील डॉक्टर ड्युटी संपवून घरी परतायच्या तयारीत होते. या घटनेची माहिती कळताच डॉ. कांचन वायकुळे रावेतवरून अवघ्या २० मिनिटांत रुग्णालयात दाखल झाल्या. जखमी महिलेची स्थिती पाहून डॉक्टरांनी तत्काळ उपचारास सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य पाहता महिला आणि पोटातील बाळही सुखरूप वाचवणे ही दुहेरी जबाबदारी डॉक्टरांवर होती.
गरोदर मातेच्या पोटातून बाहेर आलेले आतडे, अंतर्गत जखमा व मोठ्या प्रमाणात झालेला रक्तस्राव यामुळे डॉक्टरांसमोर आव्हानच उभे ठाकले. जखमी मातेच्या ईसीजी, सोनोग्राफी अशा आवश्यक तपासण्या करून डॉ. कांचन, सूरज महाडिक, पृथ्वीराज, भूलतज्ज्ञ राजेश गोटे यांनी महिलेवर अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया केली. सुदैवाने महिलेच्या गर्भाशयाला काहीही इजा न झाल्याने त्या मातेचे प्राण तर वाचलेच; शिवाय पोटातील बाळही सुखरूप आहे. हे सर्व शक्य झाले ते केवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील तत्पर डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळेच. अखेर मृत्यू हरला आणि त्या गरोदर मातेचा जणू पुनर्जन्म झाला.
वायसीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. यशवंत इंगळे, डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या सहकार्याने आणि तत्परतेमुळे गरोदर माता अंजूचा व तिच्या बाळाचा जीव वाचला. या
घटनेमुळे शहरभर वायसीएम रुग्णालय प्रशासनाचे व डॉक्टरांचे कौतुक होत आहे.
गरोदर माता अंजू अगदी गंभीर जखमी होत्या; पण तत्काळ आणि योग्य उपचार केल्यामुळेच तिचा व पोटातील बाळाचा जीव वाचू शकला. पोटाच्या बाहेर आलेली आतडी कोणतीही इजा न होता पुन्हा पोटात ढकलणे कसरतीचे होते. रुग्णालयातील सर्व सहकारी व तज्ज्ञांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
- डॉ. कांचन वायकुळे, वायसीएम रुग्णालय
मी जिवंत आहे, माझ्या पोटातील बाळही सुखरूप आहे यावर अजूनही विश्वास बसत नाही. बेशुद्धावस्थेत मला आणण्यात आले. पुन्हा नवा जन्म झाला आहे, असे वाटते. वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाºयामुळेच मी आज जिवंत आहे. - अंजू बन्सल, जखमी गरोदर माता