...असेही लाटतात भूखंड
By Admin | Updated: September 22, 2015 03:13 IST2015-09-22T03:13:13+5:302015-09-22T03:13:13+5:30
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अनेक वर्षांपासून विक्री न झालेल्या भूखंडांवर एखाद्या मंदिराची स्थापना करून तो व त्याच्या आजूबाजूची जागाही निवासासाठी लाटली जात आहे

...असेही लाटतात भूखंड
पिंपरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अनेक वर्षांपासून विक्री न झालेल्या भूखंडांवर एखाद्या मंदिराची स्थापना करून तो व त्याच्या आजूबाजूची जागाही निवासासाठी लाटली जात आहे. विशेष म्हणजे हे अतिक्रमण एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानेच होत आहेत.
भोसरी, पिंपरी व चिंचवड भागातील बहुतांश भूखंड अशा पद्धतीने लाटले गेलेले आहेत. एमआयडीसीत काम करणारे अधिकारी-कर्मचारी आपल्या कामाचा, पदाचा गैरवापर करून एखाद्या विश्वस्त संस्थेला असा भूखंड देतात. येथे त्यांच्याच सांगण्यावरून रातोरात एखादे मंदिर उभे केले जाते. तेथे अतिक्रमणविरोधी पथकाकडून सुद्धा कारवाई करण्याचे धाडस केले जात नाही. याचाच फायदा घेऊन अशाप्रकारे ३, ५, १० गुंठ्यांचे मोठे भूखंड लाटले गेले आहेत.
चिंचवडजवळील मोहननगर भागात एमआयडीसीच्या जागेवर अनेक विश्वस्त संस्थांनी व चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली मंदिर बांधण्याचे कारण पुढे करून भूखंंड घेतले गेले. याला लागूनच रहिवासी बांधकामे झाली आहेत. असाच प्रकार संभाजीनगरमध्येही पाहायला मिळत आहे. ट्रस्टच्या व विश्वस्त संस्थेच्या नावाखाली धार्मिक स्थळे उभारली आहेत. शहरातील मोक्याच्या ठिकाणचे कोट्यवधींचे भूखंड लाटले जात आहेत. अनेक वर्षांपासून येथे धार्मिक मंदिरे उभारली आहेत. विश्वस्तांची कार्यकारिणी तयार केली जाते. काही भूखंडांवर उभारलेल्या धार्मिक स्थळांच्या बाजूला तर दुकाने थाटली आहेत. ती भाड्याने देऊन व्यावसायिक वापर होतो.(प्रतिनिधी)