पिंपरी : जखमी झालेल्या एका बालकाला वायसीएममध्ये नेण्यात आले. डोक्याला मार लागला असल्याने सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास त्याला तातडीक विभागात नेले. डॉक्टरांनी पाहिले. टाके घालावे लागतील, असे सांगून बाहेरील औषध दुकानातून त्यांना रुग्णालयीन साहित्य आणण्यास सांगितले. टाके घालण्याच्या दोऱ्यापासून ते केस काढण्यासाठी लागणारे ब्लेड अशा विविध वस्तू बाहेरून विकत आणण्याची सक्ती करण्यात आली. वायसीएममध्ये मिळालेल्या कटू अनुभवामुळे उपचार अर्धवट सोडून ती महिला मुलाला घेऊन गावी निघून गेली. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र सर्व साहित्य रुग्णालयात उपलब्ध होते. कोणालाही सक्ती केली जात नाही, असे स्पष्टीकरण दिले. घराच्या जिन्यातून पडून काळेवाडी, रहाटणीत एक मुलगा गंभीर जखमी झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या आईने त्याला वायसीएम रुग्णालयात नेले. या शहरात नातेवाइकांकडे आलेली महिला रुग्णालयातील तातडीक विभागात गेल्यानंतर बाहेरच्या औषध दुकानातून वस्तू आणण्याची यादी त्यांना डॉक्टरांनी दिली. मुलाला तेथेच सोडून एका कार्यकर्त्याबरोबर धावपळ करण्याची वेळ त्या महिलेवर आली. त्या महिलेला सर्व काही नवीन होते. रुग्णालयीन साहित्य रुग्णालयातच मिळते की, बाहेरून आणावे लागते याबद्दल काहीच माहिती नव्हते. परंतु डॉक्टरांनी यादी दिल्यानंतर त्यांच्या मदतीला धावून गेलेल्या कार्यकर्त्याच्या लक्षात ही बाब आली. वाद घालण्यापेक्षा मुलावर उपचार होणे महत्त्वाचे असल्याने त्या कार्यकर्त्यानेच पदरमोड करून साहित्य आणून दिले. ते आणून दिल्यानंतर डॉक्टरांना या मुलाकडे पाहण्यास, त्याच्यावर उपचार करण्यास सवड मिळत नव्हती. महिलेची खर्च करण्याची ऐपत नव्हती. जवळ होती ती रक्कम बाहेरून औषध आणण्यासाठी खर्च झाली होती. अशातच डॉक्टरांनी मुलाचे सिटी स्कॅन करून घेण्याचा सल्ला दिला. महापालिकेचे रुग्णालय तरीही खर्च परवडणारा नाही, हे लक्षात येताच सिटी स्कॅनसाठी न थांबता तेथून निघून जाण्याचा निर्णय त्या महिलेने घेतला. वायसीएममध्ये आलेले कटू अनुभव महिलेला मदत करणाऱ्या कार्यकर्त्याने ‘लोकमत’कडे कथन केले. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, तसेच डॉ. पवन साळवे यांच्याकडे याबाबत संपर्क साधण्यात आला. दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयातच रुग्णालयीन साहित्य उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. रुग्णाच्या नातेवाइकांना बाहेरून औषध आणण्याची कधी सक्ती केली जात नाही. (वार्ताहर)
‘वायसीएम’मध्ये अजब कारभार
By admin | Updated: January 11, 2016 01:13 IST