वाहन प्रवेशकर आकारणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:07 IST2017-08-02T03:07:05+5:302017-08-02T03:07:05+5:30
हन प्रवेशशुल्क वसुली येत्या गुरुवारपासून (दि. ३) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या विशेष बैठकीत घेण्यात आला.

वाहन प्रवेशकर आकारणी सुरू
देहूरोड : वाहन प्रवेशशुल्क वसुली येत्या गुरुवारपासून (दि. ३) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. हद्दीतून ये-जा करणाºया वाहनांच्या वाहन प्रवेशशुल्क व मासिक पास दरात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. तसेच स्थानिक व्यावसायिक वाहनांना मासिक पास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सोमवारी सायंकाळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ओ. पी. वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बोर्डाच्या विशेष बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, बोर्ड सदस्य रघुवीर शेलार, सारिका नाईकनवरे, हाजीमलंग मारिमुत्तू, ललित बालघरे, अॅड. अरुणा पिंजण, कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत, विभागीय प्रशिक्षण विभागाचे व्यवस्थापक नरेंद्र महाजनी, जकात विभागाचे चंद्रकांत कुºहाडे आदी उपस्थित होते.
देशात वस्तू व सेवा कर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने रक्षा संपदा विभागाच्या ३० जूनच्या पत्रानुसार देहूरोड कॅन्टोन्मेन्ट बोर्डाकडून आकारण्यात येणारा जकातकर, पारगमन शुल्क व वाहन प्रवेशशुल्क वसुली एक जुलैपासून बंद करण्याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाने कार्यवाही केली होती. बोर्डाच्या हद्दीतील पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील निगडी व शेलारवाडी, तसेच कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गवरील शितळानगर (मामुर्डी), देहूगाव ते देहूरोड रस्त्यावरील झेंडेमळा, तसेच देहूरोड रेल्वे स्थानकाजवळ असणारा जकात नाका असे सर्व पाचही जकात नाके बंद करण्यात आले होते. सर्व जकात नाक्यांवर दर्शनी भागात जकात नाकी बंद झाल्याचे मोठे फलक लावले होते. मात्र रक्षा संपदा विभागाच्या महानिर्देशक कार्यालयाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डाला शनिवारी (दि. २९) प्राप्त झालेल्या एका पत्रानुसार केंद्रीय महसूल विभागाने संरक्षण विभागास दिलेल्या खुलाशानुसार वस्तू व सेवा कर लागू झाला असला, तरी कॅन्टोन्मेंट कायद्यातील (२००६ कलम ६७ ई नुसार) तरतुदीनुसार वाहन प्रवेशशुल्क वसुली करता येते.
वाहन प्रवेशशुल्कात वाढ करण्यास, तसेच मासिक पास दरात वाढ करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.