कारवाईनंतर पुन्हा सुरू होतात दारूअड्डे
By Admin | Updated: July 24, 2015 04:32 IST2015-07-24T04:32:08+5:302015-07-24T04:32:08+5:30
पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत हातभट्टी आणि गावठी दारूचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. रहाटणी, पिंपळे सौदागर, वाकड, काळाखडक

कारवाईनंतर पुन्हा सुरू होतात दारूअड्डे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत हातभट्टी आणि गावठी दारूचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. रहाटणी, पिंपळे सौदागर, वाकड, काळाखडक, निगडी, नेहरुनगर, पिंपरी, चिंचवड, भोसरी या भागांत मोठ्या प्रमाणावर अवैध दारूअड्डे आहेत. परवानाधारक, विनापरवाना दारूविक्री करणाऱ्यांना कशाचेच भय नाही. रात्री बारानंतरही अनेक ठिकाणी मद्यपींचे अड्डे सुरू असतात. भर रस्त्यात मद्यपींचा वावर असतो. ही परिस्थिती कायदा, सुव्यवस्था धोक्यात आणणारी असूनही त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. याबद्दल नागरीक चिंता व्यक्त करीत आहेत.
रस्त्यावरच मद्यपींचा वावर
पिंपरी : रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात अनेक ठिकाणी दारू पिणारे रस्त्यावरच आपले बस्तान मांडत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या सर्वांना पोलिसांचाच वरदहस्त असल्याने तक्रार करावी कुणाकडे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे. पिंपळे सौदागर परिसरात ठरावीक ठिकाणी रात्री केव्हाही दारू हमखास मिळतेच. रात्री बारानंतर भर रस्त्यावर रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात झिंगलेल्या अवस्थेतील मद्यपींचा वावर दिसून येतो. त्यामुळे पानटपऱ्या व अन्य दुकाने या भागात रात्रीही खुली असतात.
बाहेरून केशकर्तनालय, आत हातभट्टी अड्डा
रावेत : रावेत, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, पुनावळे, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर आदी भागांत गावठी दारूची विक्री राजरोस सुरू आहे. वाल्हेकरवाडी येथील भोंडवे वस्तीत गावठी दारूची विक्री सुरू आहे. चिंचवड -वाल्हेकरवाडी या मुख्य मार्गावर केशकर्तनालयात गावठी दारूविक्री होते. दुकानाला केवळ केशकर्तनालयाचे नाव दिले आहे आणि आतमध्ये गावठीबरोबरच देशी-विदेशी मद्याची विक्री होते. बिजलीनगर येथील नागसेननगर झोपडपट्टीत दोन ते तीन गावठी दारूविक्रेत्यांनी आपला व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू ठेवला आहे. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या नावाखाली हा व्यवसाय तेजीत चालतो. गुरुद्वार चौकाच्या बाजूस असणाऱ्या झोपडपट्टीतही गावठी दारूविक्री केली जाते. वाल्हेकरवाडी-रावेत मार्गावर असणाऱ्या एका हॉटेलशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये गावठी दारूविक्री होते.
वाकडमध्ये गावठी दारूचे धंदे
वाकड : १६ नंबर, थेरगाव गावठाण, काळाखडक, म्हातोबानगर, अष्टविनायक कॉलनी, वाकड रोड, अण्णाभाऊ साठेनगर, कस्पटेवस्ती, पवारनगर, ताथवडे, लोंढे वस्ती आदी भागात सर्वाधिक गावठी दारूचे धंदे जोरात सुरू आहेत. एकट्या काळाखडक झोपडपट्टीत सर्वाधिक सहा दारूधंदे असून, लपून-छपून विक्री सुरू आहे. सध्या वाकड हद्दीतील पूर्वीच्या दारूभट्ट्या शहरीकरणामुळे बंद झाल्या असून, ग्रामीण भागात स्थलांतरित झाल्या आहेत. दारूपुरवठा प्रामुख्याने शिरगाव येथील नदीकाठच्या भट्टीवरून केला जातो.
‘काळाखडक’मध्ये सहा जण दगावले
काळाखडक : वाकड ठाण्याच्या हद्दीतील काळाखडक झोपडपट्टीत सर्वाधिक अड्डे असून, माल (दारू) कडक ठेवण्याच्या चढाओढीत यातील बहुतेकजण दारूमध्ये केमिकल किंवा बॅटरीच्या सेलमधील काळ्या भागाची भुकटी मिसळत असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर येथील रहिवाशांनी दिली. ही विषारी दारू पिऊन आजवर येथील सुमारे ५ ते ६ जणांना प्राण गमवावे लागले असल्याची माहिती काही जणांनी दिली, तर एक विशिष्ट प्रकारचा केमिकल ड्रॉप मिळतो. त्याचे तीन ते चार थेंब टाकून एक छोटा टेम्पो (काळे कॅन) दारू बनविली जाते.