मतदानात अडथळा आणल्यास कारवाई
By Admin | Updated: August 3, 2015 04:18 IST2015-08-03T04:18:50+5:302015-08-03T04:18:50+5:30
ग्रामपंचायत निवडणुकांमधील प्रचाराच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले असून मतदारांना निर्भयपणे

मतदानात अडथळा आणल्यास कारवाई
पुणे : ग्रामपंचायत निवडणुकांमधील प्रचाराच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले असून मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी जिल्ह्यात सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतदान प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ़ जय जाधव यांनी सांगितले़
जिल्ह्यात ६१२ ग्रामपंचायती व ७ ठिकाणी पोटनिवडणुका होत असून त्यासाठी ४ आॅगस्टला मतदान होणार आहे़ या पार्श्वभूमीवर डॉ़ जाधव म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींपेक्षा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अधिक काळजी घ्यावी लागते़ त्यात स्थानिक पातळीवरील वादावादीचे
रुपांतर कायदा सुव्यवस्थेवर
होऊ शकतो़ हे लक्षात घेऊन
सर्व अधिकाऱ्यांना निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्याबरोबर
प्रत्येक गावात बैठका घेऊन सूचना देण्यास सांगितले होते़ गावातील मंदिरात बैठका घेण्यात येऊन आचारसंहिता पाळण्याचे आवाहन करण्यात आले़ त्याचा चांगला परिणाम दिसून आला़ महामार्गावरील ढाब्यांवर जेवणावळी सुरु केल्याचे लक्षात आल्यावर ढाबाचालकांना सूचना देण्यात आल्या व त्याचे व्हिडिओ शुटींग करण्याचे आदेश दिले़ त्याचा परिणाम अशा जेवणावळी बंद झाल्या़
आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी प्रत्येक तालुक्याची जबाबदारी एका उपविभागीय अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली़ त्यांना स्वतंत्र पथक देण्यात आले़ याशिवाय पोलीस ठाण्याचा स्वतंत्र बंदोबस्त ठेवण्यात आला़ जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवानाधारकांना आपल्याकडील शस्त्रे जमा करण्यास सांगितले़ (प्रतिनिधी)