कार्यकर्त्यांनी दिले ५१ हजार
By Admin | Updated: April 7, 2016 00:36 IST2016-04-07T00:36:26+5:302016-04-07T00:36:26+5:30
बांधकामावर मजूर म्हणून काम करणाऱ्या सुनीता पवार या महिलेवर विजेचा धक्का लागून दोन्ही हात गमावण्याची वेळ आली.

कार्यकर्त्यांनी दिले ५१ हजार
पिंपरी : बांधकामावर मजूर म्हणून काम करणाऱ्या सुनीता पवार या महिलेवर विजेचा धक्का लागून दोन्ही हात गमावण्याची वेळ आली. लोकमतने तिची संघर्षमय जीवनगाथा उलगडल्यानंतर समाजातून तिला मदतीचा ओघ सुरू झाला. भारतीय जनता पक्षाच्या पिंपरीतील कार्यालयात ३६व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी जमा केलेला ५१ हजारांचा मदतनिधी तिच्याकडे सुपूर्द केला. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.
भाजपाच्या सांगवी- चिंचवड मंडलच्या कार्यकर्त्यांनी महिलेला देण्यासाठी निधी जमा केला. संजय गांधी निराधार योजना समितीचे गोपाळ माळेकर, तसेच अरुण पवार, शिवाजी खुळे, अनिल नखाते,
संजय मरकड, जवाहर ढोरे, राज तापकीर, माधव मनोरे, चंद्रकांत नखाते, दीपक नागरगोजे, गणेश नखाते यांनी पुढाकार घेऊन अपंगत्व आलेल्या महिलेला मदतीचा हात दिला. भाजपा कार्यालयात झालेल्या कार्यक़्रमास डॉ. गीता आफळे, अर्चना भालेराव, सीमा सावळे, आशा शेंडगे आदी उपस्थित होते.
दोन्ही हात नसलेल्या सुनीता पवार यांना स्माइल प्लस सोशल फाउंडेशनच्या वतीने मदत जाहीर झाली आहे. पवार यांच्यासाठी
दोन वेळचे जेवण, नाष्टा व धुणी-भांडी करण्याची जबाबदारी संस्थेच्या
वतीने शांताई नगनूर या महिलेवर सोपविण्यात आली असून, संस्था
या कामासाठी त्यांना दरमहा दोन
हजार रुपये मानधन आणि किराणा माल देणार आहे, अशी माहिती
संस्थेचे अध्यक्ष योगेश मालखरे
यांनी दिली. (प्रतिनिधी)जगण्यास मिळाले बळ : सुनीता पवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन शासकीय स्तरावरून सर्वतोपरी मदत दिली आहे. राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना समक्ष पाठवले. आस्थेने विचारपूस केली. २५ हजारांची मदतसुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली. समाजातून मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले. शासनानेसुद्धा तातडीने मदत दिली. त्यामुळे अपंगत्वामुळे दु:ख आले असले, तरी संकटसमयी समाज आणि शासनाकडून मिळालेली मदत मोलाची वाटते. जगण्यास आणखी बळ मिळाले आहे, अशा भावना सुनीता पवार यांनी व्यक्त केल्या.