वर्षाला ५०० झाडांवर ‘कुऱ्हाड’
By Admin | Updated: July 21, 2015 03:44 IST2015-07-21T03:44:12+5:302015-07-21T03:44:12+5:30
शहरात विकासकामे तसेच बांधकामांच्या नावाखाली वर्षाला ५०० झाडांवर महापालिकेच्या मान्यतेने कुऱ्हाड फिरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली

वर्षाला ५०० झाडांवर ‘कुऱ्हाड’
पुणे : शहरात विकासकामे तसेच बांधकामांच्या नावाखाली वर्षाला ५०० झाडांवर महापालिकेच्या मान्यतेने कुऱ्हाड फिरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे १ जानेवारी २०१२ ते ३० जून २०१५ या साडेतीन वर्षांच्या कालावधीत ही वृक्षतोड झाली असल्याची माहिती उद्यान विभागाने प्रश्नोत्तरात दिली आहे. विशेष म्हणजे या तोडण्यात आलेल्या झाडांचे पुनर्रोपण करणे अथवा त्यांच्या बदल्यात तिप्पट झाडे लावण्याच्या आदेश असतानाही, केवळ ही झाडे लावल्याचे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून ही वृक्षतोड केली जात आहे.
महापालिकेच्या उद्यान विभागाकडून शहरातील रस्ते, तसेच महापालिकेच्या प्रकल्पांच्या इतर कामांसाठी झाडे तोडली जातात. तर शहरातील बांधकाम व्यावसायिकांकडूनही नवीन बांधकामांसाठी वृक्षतोडीस परवानगी दिली जाते. महापालिकेकडून गेल्या तीन वर्षांत किती वृक्ष तोडण्यास परवानगी दिली, याबाबत उद्यान विभागास नगरसेवक अॅड. किशोर शिंदे यांनी प्रश्न विचारला होता. त्याबाबत प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत १५ हजार ३९१ वृक्ष काढणे, तसेच फांद्यांच्या तोडण्यासाठी महापालिकेस अर्ज आलेले होते. त्यापैकी
१३८०५ वृक्षांच्या फांद्या तोडण्यास परवानगी देण्यात आली असून,
१५८९ अर्जदारांना पूर्ण वृक्ष
काढण्यास, तसेच पुनर्रोपण
करण्यास परवानगी देण्यात आलेली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर ३२९ वृक्षांच्या तोडीची अथवा पुनर्रोपणाची परवानगीही नाकारण्यात आलेली आहे.(प्रतिनिधी)