मिळकतकरासाठी स्वीकारणार ५००, १००० रुपयांच्या नोटा
By Admin | Updated: November 11, 2016 01:45 IST2016-11-11T01:45:41+5:302016-11-11T01:45:41+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेने मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांकडून ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळकतकरासाठी स्वीकारणार ५००, १००० रुपयांच्या नोटा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांकडून ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाच्या आदेशानुसार शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारल्या जाणार असून शहरातील मिळकतधारकांनी कर भरावा, असे आवाहन महापालिका सहआयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.
मंगळवारपासून ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्या आहेत. मात्र, पेट्रोलपंप, गॅस, रुग्णालय, औषधांची दुकाने याठिकाणी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या नगरविकास विभागाने राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांना मिळकतकर भरणारया नागरिकांकडून ५०० आणि १००० रुपायांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी ११ नोव्हेंबर (शुक्रवार) मध्यरात्रीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने मिळकतकरापोटी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये ८ नोव्हेंबरपूर्वी महापालिकेने मागणी केलेल्या मिळकतधारकांकडूनच कर भरताना ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. विवादित किंवा प्रतिसाक्षित मिळकतराचा भरणा करून घेतला जाणार नाही.
संबंधित मिळकतधारकाला स्वत: किंवा प्राधिकृत केलेली व्यक्ती किंवा ओळखीचा पुरावा सादर करणारया त्रयस्थ व्यक्तीमार्फत महापालिकेकडे मिळकतकर भरता येईल. महापालिकेची सर्व सहा क्षेत्रीय कार्यालये तसेच १६ विभागीय कार्यालयात सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत मिळकतकर भरण्यासाठी येणारया मिळकतधारकांकडून या नोटा स्वीकारल्या जातील, असे गावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)