देहूगावात ३८ घरे जमीनदोस्त
By Admin | Updated: October 27, 2015 00:58 IST2015-10-27T00:58:34+5:302015-10-27T00:58:34+5:30
येथील देहू-आळंदी रस्त्यावरील लक्ष्मीनगर भागातील महसूल विभाग व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागाच्या संयुक्त अतिक्रमणविरोधी कारवाईत ३८ घरांवर हातोडा चालवून जमीनदोस्त करण्यात आले

देहूगावात ३८ घरे जमीनदोस्त
देहूगाव : येथील देहू-आळंदी रस्त्यावरील लक्ष्मीनगर भागातील महसूल विभाग व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागाच्या संयुक्त अतिक्रमणविरोधी कारवाईत ३८ घरांवर हातोडा चालवून जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईमुळे देहू-आळंदी रस्त्याने मोकळा श्वास घेतला असुन रुंदीकरण प्रक्रियेस गती मिळणार आहे.
कारवाईपूर्वीच रहिवाशांनी घरातील साहित्य व पत्रे काढून सुरक्षित ठिकाणी नेल्याने जास्त नुकसान झाले नाही. अतिक्रमणविरोधी पथकाने तीन जेसीबी, ६ डंपर, ट्रॅक्टर व १५ मजुरांच्या साह्याने ४० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण केली.
देहूगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत देहू-आळंदी रस्ता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत विकसित केला जाणार आहे. या रस्त्याचे महापालिका हद्दीतील रुंदीकरण झाले आहे. मात्र, देहू ग्रामपंचायत हद्दीतील काम रखडले आहे. हा रस्ता अद्याप महापालिकेकडे हस्तांतरित झाला नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून, रस्त्याच्या जागेचा ताबा मिळवणे आवश्यक होते. याबाबत महसूल विभागाच्या वतीने कारवाई सुरू आहे. दोन आठवड्यांपूर्वी येथील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी प्रांताधिकारी स्नेहल बर्गे यांच्या उपस्थितीत बैठख झाली. आळंदी रस्त्याच्या उत्तर बाजूकडील शेतजमिनीचा रस्त्यामुळे झालेला तुकडा व त्यावरील अतिक्रमणामुळे झालेल्या नुकसानीचा पाढाच शेतकऱ्यांनी वाचला होता. त्याची दखल घेत बर्गे यांनी लक्ष्मीनगरमधील रहिवाशांनी दहा दिवसांत बांधकामे स्वत: काढून घ्यावीत अन्यथा कारवाई करू, असे सांगितले होते.
सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अप्पर तहसीलदार किरणकुमार काकडे, मंडलाधिकारी सूर्यकांत पाटील, तलाठी मिलिंद मनवर, सचिन मोरे, बीआरटीएस विभागाचे सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, उपअभियंता बापूसाहेब गायकवाड, ग्रामसेवक अर्जुन गुडसुरकर यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू झाली. ती सायंकाळपर्यंत चालली. उपनिरीक्षक लालासाहेब गव्हाणे व सहकाऱ्यांच्या मदतीने कारवाई झाली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (वार्ताहर)