कर्मचाऱ्यामुळे वाचले ३५ प्रवाशांचे प्राण
By Admin | Updated: October 14, 2016 05:39 IST2016-10-14T05:39:26+5:302016-10-14T05:39:26+5:30
वल्लभनगरच्या चाणाक्ष कर्मचाऱ्यामुळे मद्यपान करून एसटी चालविण्यास बसणाऱ्या चालकास पकडले आहे़ त्यामुळे एसटीतील ३० ते ३५ प्रवाशांचा जीव

कर्मचाऱ्यामुळे वाचले ३५ प्रवाशांचे प्राण
पिंपरी : वल्लभनगरच्या चाणाक्ष कर्मचाऱ्यामुळे मद्यपान करून एसटी चालविण्यास बसणाऱ्या चालकास पकडले आहे़ त्यामुळे एसटीतील ३० ते ३५ प्रवाशांचा जीव वाचल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरू होती़
गुरुवारी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी भुम आगारातून मुंबईला निघालेली एसटी (एमएच २० बीटी २७०६) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकात पोहचली़ भुम आगाराचे दोन चालक एसटीच्या प्रवासासाठी होते़ पहिल्या चालकाने गाडी स्वारगेट स्थानकात पोहचविली़ थोडा वेळ थांबल्यानंतर मुंबईच्या प्रवासाला निघण्यासाठी स्वारगेटवरून बसलेला दुसरा एसटीचालक एल़ एस़ चव्हाण याने संचेती रुग्णालयापासून पुणे - मुंबईकडे जाणाऱ्या दिशेने एसटी वळविली़ साडेचार वाजण्याच्या सुमारास पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर आगारात एसटी दाखल झाली़ एसटीमध्ये ३० ते ३५ प्रवाशी मुंबईच्या प्रवासासाठी बसले होते़ १० मिनिटांत एसटी सुरू होऊन पुढच्या प्रवासाला निघणे अपेक्षित होते़ मात्र, चालकाने वल्लभनगरच्या आगारात गाडीची नोंद करण्यासाठी व ब्रेक सेटिंग करावयाचे असल्याने लॉगशिट डेपोत देऊन तो बाहेर निघून गेला़
साधारण अर्ध्या ते पाऊण तासाने एसटीचा चालक चव्हाण डेपोत लॉगशिट घेण्यासाठी गेला़ एसटीचा चालक खूप वेळाने आल्यामुळे वल्लभनगर आगारातील हेड मेकॅनिक एम़ बी़ नवगिरे यांना आश्चर्य वाटले़ लॉकशिट घेऊन जाताना एसटीचा चालक चालताना डुलत-डुलत चालत असल्याचे नवगिरे यांच्या लक्षात आले़ त्यांनी ही बाब त्वरित वरिष्ठांच्या कानावर घातली़ एसटीचा चालक चव्हाण एसटी सुरू करण्यासाठी जात असताना वल्लभनगरच्या कर्मचाऱ्यांनी त्यास पकडले़ त्या वेळी तो मद्यपान करून आल्याचे त्यांच्या ध्यानात आले़ वल्लभनगरच्या आगार व्यवस्थापकांनी एसटी चालकास पकडून वायसीएम रुग्णालयात तपासणीसाठी नेले़
मुंबईला निघालेल्या प्रवाशांना एक तासापेक्षा अधिक वेळ वल्लभनगरच्या आगारात थांबावे लागले़ आगार प्रमुखांनी दुसऱ्या चालकाची नेमणूक करून एसटी मुंबईच्या दिशेने घेऊन जाण्याची परवानगी दिली़ (प्रतिनिधी)