पिंपरी : करारनामा झालेला असताना बनावट विकसन करारनामा तयार केला. त्यातून बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केली. तसेच बांधकाम साईटवर असलेले सिमेंट आणि स्टील स्वत:च्या फायद्यासाठी वापरले. हा प्रकार भोसरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झाला आहे. याप्रकरणी विजय वामन येळवंडे (वय ३९, रा. निघोजे, ता. खेड, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, आतिष मोहन भालसिंग (रा. गहुंजे, देहूरोड), ओमप्रकाश एल भाटिया (रा. रावेत), कमलेश श्यामलाल बठीजा (रा. चतु:शृंगी), गिरीधर अंकुशराव गायकवाड (रा. भोसरी), सागर भीमराव परामणे (रा. वाल्हेकरवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय रियल इस्टेट आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. २०१२ साली त्यांनी गोधन प्रॉपर्टीज नावाने फार्म स्थापन केली. त्या फार्ममध्ये आरोपी कमलेश, गिरीधर आणि सागर भागीदार होते. विजय यांनी आरोपी ओमप्रकाश यांच्याकडून रावेत येथील सुमारे पाच गुंठे जमिनीचे कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र करून घेतले. विजय आणि ओमप्रकाश यांच्यामध्ये विकसन करारनामा झालेला असताना आरोपींनी पुन्हा दुसरा बनावट विकसन करारनामा व कुलमुखत्यारपत्र केले. तसेच आरोपी आतिष यांनी विजय यांच्यासोबत भाडेकरार झालेला असताना विजय यांच्या परस्पर दुसºया इसमांसोबत भाडेकरार केला. गोधन प्रॉपर्टीजमध्ये बेकायदेशीररीत्या भाडेकरू ठेवले. तसेच विजय यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी विजय यांची सुमारे २ कोटी ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. तसेच ४ लाख ५० हजार रुपयांचे सिमेंट, स्टील मटेरियल आरोपींनी स्वत:च्या फायद्यासाठी वापरून त्याचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
भोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 19:28 IST
बांधकाम साईटवर असलेले सिमेंट आणि स्टील स्वत:च्या फायद्यासाठी वापरले...
भोसरीत बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक
ठळक मुद्देभोसरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार