विमान प्रवासात पावर बँक चेक-इन बॅग ऐवजी केबिन बॅगमध्ये ठेवायला का सांगतात? जाणून घ्या महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 04:45 PM2022-02-21T16:45:36+5:302022-02-21T17:03:19+5:30

विमान प्रवास करताना चेक-इन बॅगमध्ये पावर बँक नेऊ देत नाहीत, परंतु केबिन बॅगमध्ये तुम्ही दोन पावर बँक सोबत बाळगू शकता.

जर तुम्ही तुम्ही नियमित विमान प्रवास करत असाल तर तुम्हाला कधी तरी तुमच्या चेक इन बागेतील पावर बँक केबिन बॅगमध्ये ठेवण्यास सांगितली असेल. तुम्हाला या गोष्टीचा राग देखील आला असेल.

कोणत्या गोष्टी विमान प्रवासात सोबत बाळगता येतात आणि कोणत्या नाही याची यादी एयरलाईन्सकडून दिली जाते. परंतु त्यामागील कारण मात्र सांगितले जात नाही.

पावर बँक चेक-इन बॅग्समध्ये निषिद्ध आहे हे तुम्हाला माहित असेल, परंतु त्यामागील कारण माहित असण्याची शक्यता कमी असेल. जो डिवाइस केबिनमध्ये ठेवता येतो तो कार्गोमध्ये का ठेवता येत नाही, असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल.

यामागे विमानाची सुरक्षा कारणीभूत आहे. पावर बँकमध्ये लिथियम सेल्सचा वापर केला जातो, जे पेट घेऊ शकतात. या आगीचं मोठ्या आगीत रूपांतर होऊ शकतं.

जर पावर बँकनं कार्गोमध्ये पेट घेतला तर ती आग क्रू मेम्बर्सना समजणार नाही आणि त्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

परंतु जर पावर बँक प्रवाश्याकडे असेल तर तिला लागलेली आग सहज लक्षात येईल. तसेच केबिनमधील अग्निशमन उपकरणांच्या मदतीनं ती विझवता येईल.

क्ले किंवा तत्सम पदार्थांचा वापर करून बनवलेल्या काही पावर बँक्स स्कॅन केल्यावर बॉम्ब असल्यासारख्या भासतात. परंतु चांगल्या क्वॉलिटीच्या पावर बँक्समध्ये कोणतीही समस्या येत नाही, अशी माहिती सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्योरिटी फोर्सनं हिंदुस्थान टाइम्सला दिली आहे.

आता तुम्हाला पावर बँक्स चेक-इन बॅग ऐवजी केबिन बॅगमध्ये ठेवायला का सांगतात याचं उत्तर मिळालं असेल. पुढील वेळी विमान प्रवासाला जाताना ही काळजी घेतल्यास तुमचा वेळ वाचू शकतो.