शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:25 IST

1 / 8
प्रेमानंद महाराज हे स्वतः असं व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांनी स्वतः एका दुर्धर आजारावर मात केली आहे आणि ते सदासर्वदा प्रसन्न मुद्रेने लोकांना सामाजिक, अध्यात्मिक प्रबोधन करतात. त्यामुळे मोबाईलवर स्क्रोल होणारी बोटं महाराजांचा व्हिडीओ लागताच दोन सेकंद थांबून, ऐकून मग पुढे जातात. अशाच एका व्हिडीओमध्ये महाराजांनी मनःशांतीसाठी केलेला उपदेश जाणून घेऊ.
2 / 8
महाराजांचं एक वाक्य कायम लक्षात ठेवा, ते म्हणतात...परिस्थिती कोणतीही असो, 'मस्त रहना सीखो' तुमचं काम प्रामाणिकपणे करा, देवावर भार टाका आणि निश्चिन्त व्हा. तसंही तुम्ही काळजी करण्याने परिस्थिती बदलणार नाही, मग अतिविचाराने मनःस्थिती तरी कशाला बिघडवता? शांत राहा, आनंदी राहा. देवावर विश्वास ठेवा, जे होईल ते चांगल्यासाठीच होईल!
3 / 8
'जसे अन्न तसे मन' तुम्ही सतत बाहेरचं खात असाल तर आरोग्य बिघडणारच आणि ज्यांना आरोग्याच्या तक्रारी असतात त्यांचं मनही शांत राहणार नाही. यासाठी सात्विक आहार म्हणजेच घरी केलेला, कमी मसालेदार स्वयंपाक ग्रहण करा. जो रुचेल, पचेल आणि उत्तम आरोग्य देईल, त्याबरोबरच मन शांत ठेवेल.
4 / 8
ज्याला शांत झोप लागते, त्याचा दिवस उत्साहात जातो. प्रत्येकाने आठ तास झोप घेतली पाहिजे. झोपण्याआधी फोन बघू नका. विचार करू नका. देवाचे नाव घ्या, रात्री १० वाजता झोपा, पहाटे ४-६ दरम्यान अलार्म न लावताही तुम्हाला आपसूक जाग येईल आणि मन चिंतामुक्त राहील.
5 / 8
सगळ्यात जास्त जिव्हारी लागणारं शस्त्र म्हणजे जीभ! कारण जिभेचा वापर करून केलेले शाब्दिक घाव सहसा भरून निघत नाहीत. मजा, मस्करी, रागाच्या भरात आपण बोलून जातो, मात्र त्याचा परिणाम नात्यांवर होतो. म्हणून कमीत कमी बोलण्याची सवय करून घ्या. आवश्यक तिथे बोला. इतर वेळी मौन पाळा, अर्ध्याहून अधिक प्रश्न कमी बोलण्यामुळे सुटतील.
6 / 8
वाईट गोष्टी पाहणे, बोलणे, करणे हा अनैतिकतेचा मार्ग आहे. आपले एक मन त्यात अडकून असले तरी दुसरे मन आपल्याला वेळोवेळी इशारा देते, हे तू योग्य करत नाहीस, वेळीच थांबव. हा सतर्कतेचा इशारा ओळखा. अनैतिक मार्ग सोडा. कर नाही त्याला डर उरणार नाही. मन शांत राहील.
7 / 8
आपण आपल्या ज्ञानेंद्रियांचा, कर्मेंद्रियांचा सदुपयोग करत नाही. म्हणजेच आपल्या इंद्रियांवर आपला संयम नाही. काहीही पाहतो, काहीही ऐकतो, वाटेल तेव्हा खातो, वाटेल ते खातो, वाईट विचार करतो, मनावर ताबा नाही. या सगळ्याच बाबतीत संयम राखण्याची सवय करायला हवी. जेणेकरून एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडेल तेव्हा मनाला त्रास होणार नाही आणि ते अकारण अशांत राहणार नाही.
8 / 8
शेवटची पायरी म्हणजे देवाला शरण जाणे. महाराज म्हणतात की देवाला तुमच्या जीवनाचे केंद्र बनवा. नेहमी त्याचा विचार करा, त्याचे नाव घ्या, त्याला तुमचा मित्र बनवा आणि स्वतःला पूर्णपणे देवाला समर्पित करा. जेव्हा तुम्ही देवाला तुमचे सर्वस्व बनवता तेव्हा देव तुम्हालाही त्याचे बनवतो. तो पाठीशी आहे हा विश्वास निर्माण झाला, की चिंतेचे कारण उरत नाही आणि मनाची अस्वस्थता दूर होईल.
टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य