Bihar Assembly Election 2020 : बिहार विधानसभेचा निकाल त्रिशंकू लागल्यास अशी असतील राजकीय समीकरणे
By बाळकृष्ण परब | Updated: November 9, 2020 13:44 IST
1 / 7कोरोनाकाळातही अगदी उत्साहात पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आता केवळ काही तासांचा अवधी उरला आहे. सत्ताविरोधी लाट, तेजस्वी यादवांचा जोरदार प्रचार, नितीश कुमार यांना मानणारा वर्ग, भाजपाच्या राजकीय खेळी अशा सर्व पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत काही एक्झिट पोलमधून महाआघाडीला स्पष्ट विजय मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर एका एक्झिट पोलने एनडीएच्या विजयाचे भाकित केले आहे. तर उर्वरित एक्झिट पोलमधून अटीतटीच्या लढतीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अटीतटीची लढत होऊन त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यास कोणती समिकरणे आकारास येणार याची चाचपणी करण्यात येत आहे. 2 / 7बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांनंतर तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी आणि नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील एनडीएला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राजकीय आघाड्यांची फेर मांडणी होऊ शकते. यामध्ये चिराग पासावान यांची लोकजनशक्ती पार्टी आणि अन्य छोट्या पक्षांसह अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे निर्माण होणारी समीकरणे पुढीलप्रमाणे असू शकतात. 3 / 7 विविध कलांमधून आघाडीवर दिसत असलेल्या तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला बहुमतासाठी काही जागा कमी पडल्यास महाविकास आघाडी चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीसह अन्य छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने महाविकास आघाडीते सरकार स्थापन होऊ शकते. 4 / 7नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमतासाठी आवश्यक जागा न मिळाल्यास आणि महाविकास आघाडीही सत्तेपासून दूर राहिल्यास छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने एनडीए बहुमताचा आकडा गाठू शकते. 5 / 7एक्झिट पोलमधील काही सर्वेंमधून भाजपाला जेडीयूपेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्यक्षात असा निकाल लागून एनडीएला बहुमतासाठी काही जागा कमी पडल्यास भाजपाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत चिराग पासवान यांनी पाठिंब्याच्या बदल्यात भाजपाच्या मुख्यमंत्र्यासाठी आग्रह धरल्यास नितीश कुमार यांच्याऐवजी भाजपाचा नेता मुख्यमंत्री बनू शकतो.6 / 7भाजपाला जेडीयूपेक्षा अधिक जागा मिळाल्यास आणि भाजपाच्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरल्यास अशा परिस्थितीत नितीश कुमार पुन्हा एकदा महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ शकतात. मात्र अशा परिस्थितीत नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हे नसतील. मात्र अशी आघाडी आकारास येण्याची शक्यता सध्यातरी कमी आहे. 7 / 7बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल त्रिशंकू लागल्यास चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष, जितनराम मांझी यांचा हम तसेच उपेंद्र कुशवाहा यांचा राष्ट्रीय लोकसमाज पक्ष, मुकेश साहानी यांचा व्हीआयपी त्याबरोबरच जनअधिकार पार्टी या किरकोळ जागा जिंकरणाऱ्या पक्षांची चांदी होऊ शकते.