By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 17:29 IST
1 / 8गेल्या २ वर्षांपासून कोरोना विषाणूनं सर्वसामान्यांचं जगणं अवघड केलं आहे. जगभरातील लाखो लोकांचा कोरोनानं जीव घेतला आहे. सातत्यानं होत असलेल्या म्युटेशनमुळे कोरोना चिंता वाढवत आहे. सध्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं सगळ्यांच्या काळजीत भर पडली आहे. 2 / 8आतापर्यंत ६० हून अधिक देशांत ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या ६० च्या पुढे गेली आहे. दक्षिण आफ्रिका, ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन अतिशय वेगानं पसरला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीनं पुरवलेली सुरक्षादेखील ओमायक्रॉननं भेदली आहे.3 / 8दोन वर्षांपासून जगभरातील अब्जावधी लोक कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करत आहे. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर करावा लागत आहे. कोरोना कधी संपणार, या विषाणूचा नायनाट कधी होणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. याबद्दल तज्ज्ञांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.4 / 8जोधपूरस्थित इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-एनआयआयआरएनसीडीचे संचालक आणि कम्युनिटी मेडिसिन तज्ज्ञ डॉ. अरुण शर्मांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना संकट एंडमिक असू शकतं. कोरोनाचा प्रादुर्भाव बराच काळ राहू शकतो, असं शर्मा म्हणाले. मात्र त्यांनी दोन संपलेल्या विषाणूंचीदेखील उदाहरणं दिली.5 / 8अनेक वर्षांपूर्वी देवीची साथ आली. त्याचा फटका लक्षणीय लोकांना बसला. प्रचंड प्रमाणात बळी गेले. मात्र हळूहळू हे संकट संपूर्णपणे संपलं. त्याचं कारण त्यावरील लस होतं. अशाच प्रकारे बऱ्याच देशांमधून पोलिओचं संकटदेखील दूर झालं, असं शर्मांनी सांगितलं.6 / 8देवी, पोलिओचं संकट संपलं. त्याचप्रकारे कोरोना संकट संपेल अशी शक्यता आहे. पण हे नेमकं कधी होईल ते सांगणं अवघड असल्याचं शर्मा म्हणाले. अद्याप कोरोना विषाणूचे नवे व्हेरिएंट येत आहेत. लसीकरणदेखील पूर्ण झालेलं नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.7 / 8विषाणू नैसर्गिकपणे संपून जातात, असा पूर्वानुभव असल्याचं तेलंगणा एम्सचे संचालक डॉ. विकास भाटियांनी सांगितलं. नैसर्गिकरित्या विषाणूचा खात्मा होत असल्याचा अनुभव आहे. पण आपण आपली काळजी घ्यायला हवी. हलगर्जीपणा करायला नको. सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून कोरोना संकटाशी दोन हात केल्यास आपण नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.8 / 8कोरोनानं आता हातपाय पसरले आहेत. त्यामुळे त्याचा नायनाट कठीण असल्याचं मत दिल्ली एम्सचे माजी संचालक डॉ. एम सी मिश्र यांनी व्यक्त केलं. विषाणूचा खात्मा शक्य आहे. पण तो अवघड आहे, असं मिश्र म्हणाले.